प्राप्त माहितीनुसार, रेतीची तुटलेली पार्टनरशिप आणि रखडलेल्या आर्थिक व्यवहारामुळे शहरातील रिंगरोडवरील सहयोग हॉस्पिटल परिसरात धारदार शस्त्राने वार करून रविप्रसाद राधेलाल बंभारे (३५, रा. लोधीटोला) याचा १४ जानेवारीच्या रात्री खून करण्यात आला. या प्रकरणात आरोपी श्याम उर्फ पीटी रमेश चाचेरे (३२) रा.पोस्टमन चौक सरस्वती शाळेजवळ गोंदिया, शुभम गोपाल चव्हाण उर्फ परदेशी (२९) रा. गौशाला वॉर्ड गोंदिया, शाहरूख रज्जाक शेख (२३) रा. मदीना मशीदच्या मागे गौतमनगर गोंदिया व प्रशांत उर्फ छोटा कालू मातादीन ज्ञानेश्वर भालेराव (४०) या चौघांवर रामनगर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील आरोपींवर रामनगर पोलिसांनी मकाेका लावल्यामुळे त्यांना ६ मे रोजी गोंदियात पेशीवर आणण्यात आले. पोलिसांचे वाहन पेशीवरून भंडारा तुरुंगात नेत असताना, आरोपी श्याम उर्फ पीटी रमेश चाचेरे (३२) याने छातीत दुखायला लागले, असे नाटक केल्याने पोलिसांनी वेळीच त्याला ग्रामीण रुग्णालय सडक-अर्जुनी येथे नेले. तेथे उपचारादरम्यान आरोपीने रुग्णालयातील कात्री व सर्जिकल ब्लेडने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी त्याला रोखल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध डुग्गीपार पोलिसात भादंविच्या कलम ३०९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मकोका आरोपीने केला आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 4:29 AM