लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदाही मलेरियाने पाय पसरले असून दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांत जुलै महिन्यात मलेरिया बाधीत ३७ रूग्ण आढळून आले आहेत. दरेकसा आरोग्य केंद्र पुर्णपणे आदिवासी बहूल असून या भागात नेहमीच मलेरियाचा प्रभाव दिसून येतो. यावरून हिवताप नियंत्रण विभाग यावर तोडगा काढण्यात अपयशी ठरत आहे. परिणामी आदिवासी भागात मागील कित्येक वर्षांपासून हीच स्थिती बनून आहे.जुलै महिन्यात सालेकसा तालुक्यातील दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १ हजार ८३२ रूग्णांच्या रक्ताचे नमूने तपासण्यात आले. यातील ३७ रूग्णांना मलेरिया झाल्याची पुष्टी झाली. यात पीवीचे २ आणि पीएफचे ३५ रूग्ण आहेत. तर अप्रिल ते जुलै या चार महिन्यांत दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ७७०१ रूग्णांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली.यात ७५ रूग्णांना मलेरिया झाल्याची पुष्टी झाली आहे. जिल्ह्यातील दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्र मलेरियाच्या दृष्टीने संवेदनशील असून सर्वाधीक मलेरिया प्रभावीत आरोग्य केंद्र राहिले आहे.आरोग्य सेवेंतर्गत मलेरियासाठी दोन भाग करण्यात आले आहे. यात आदिवासी क्षेत्र व दुसरे गैर आदिवासी क्षेत्र आहेत.यातील गैर आदिवासी क्षेत्रात मलेरियाचा प्रभाव कमी दिसत आहे. तर आदिवासी क्षेत्रात मलेरिया एक दहशत ठरत असून पसरत आहे. मागील जुलै महिन्यात गैर आदिवासी क्षेत्रात २० मलेरियाग्रस्त मिळाले होते. तर आदिवासी क्षेत्रात मलेरियाग्रस्तांची संख्या १२१ होती. मागील ४ महिन्यांत आदिवासी क्षेत्रात १९९ तर गैर आदिवासी क्षेत्रात फक्त ३१ मलेरियाग्रस्त रूग्ण मिळाले.विशेष म्हणजे, फक्त दरेकसाच नव्हे तर आदिवासी बहूल फुटाणा आरोग्य केंद्रांतर्गत १३, मुल्ला केंद्रांतर्गत ६, घोनाडी केंद्रांतर्गत ५, ककोडी केंद्रांतर्गत ७, पांढरी केंद्रांतर्गत १, शेंडा केंद्रांतर्गत ४, खोडशिवनी केंद्रांतर्गत १०, कावराबांध केंद्रांतर्गत १, बिजेपार केंद्रांतर्गत ८, कोरंभीटोला केंद्रांतर्गत ३, केशोरी केंद्रांतर्गत ९, महागाव केंद्रांतर्गत २, गोठणगाव केंद्रांतर्गत ९ तर धाबेपवनी केंद्रांतर्गत ४ रूग्ण जुलै महिन्यात मिळून आले आहेत.मलेरियाने आतापर्यंत २ मृत्यूयावर्षी मलेरियाने तिगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तिगाव आरोग्य केंद्र आदिवासी क्षेत्रात नाही. मात्र तरिही या केंद्रांतर्गत जुलै महिन्यात ८ मलेरियाग्रस्त रूग्ण मिळून आले आहेत. तर कवलेवाडा आरोग्य केंद्रांतर्गत जुलै महिन्यात ७ रूग्ण मिळून आले आहेत.मागील वर्षी मिळाले होते १४२ रूग्णमागील वर्षी सन २०१७ मध्ये जुलै महिन्यात ५२ हजार ६६३ रूग्णांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली होती. यातील १४२ रूग्ण मलेरियाग्रस्त निघाले होते. सन २०१६ मध्ये ६३ हजार ६३५ रूग्णांची तपासणी करण्यात आली होती. यात २४४ मलेरियाग्रस्त निघाले होते. तर सन २०१५ मध्ये ४२ हजार ५६६ रूग्णांची तपासणी करण्यात आली असता त्यात १३१ रूग्ण मलेरियाग्रस्त निघाले होते. मागील तीन वर्षांत जुलै महिन्यात एक-एक रूग्णाचा मृत्यू झाला होता. तर यंदा मात्र २ जणांचा मृत्यू झाला आहे.
मलेरियाने पाय पसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 9:41 PM
जिल्ह्यात यंदाही मलेरियाने पाय पसरले असून दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांत जुलै महिन्यात मलेरिया बाधीत ३७ रूग्ण आढळून आले आहेत. दरेकसा आरोग्य केंद्र पुर्णपणे आदिवासी बहूल असून या भागात नेहमीच मलेरियाचा प्रभाव दिसून येतो. यावरून हिवताप नियंत्रण विभाग यावर तोडगा काढण्यात अपयशी ठरत आहे. परिणामी आदिवासी भागात मागील कित्येक वर्षांपासून हीच स्थिती बनून आहे.
ठळक मुद्देदरेकसा परिसरात ३७ रूग्ण : यावर्षी दोघांचा मृत्यू