एका महिलेचा मृत्यू : दरेकसा उपकेंद्रात तापाचे थैमान; यंदा आढळले १८४ रूग्ण लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : हिवतापामुळे मृत्यू होऊ नये यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहे. परंतु सालेकसा तालुक्याच्या दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रांर्गत येणाऱ्या चार गावात मलेरियाचा उद्रेक होण्याची चिन्हे दिसत आहेत. मुरकुटडोह, डहाराटोला, टोयागोंदी व बोईरटोला या नक्षलदृट्या अतिसंवेदनशील चार गावात मलेरियाचा उद्रके झाला आहे. परंतु जिल्हा हिवताप कार्यालयाने या गावात उद्रेक झाल्याचे घोषित केले नाही. या गावात प्रत्येकी चार रूग्ण मलेरियाने पॉझीटीव्ह आढळले. जानेवारीपासून आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यात १८५ मलेरियाचे रूग्ण आढळले. त्यात एकट्या दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४३ रूग्ण आढळले आहेत. जानेवारी ते जून या सहा महिन्यात दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत येणाऱ्या गावांमध्ये २३ रूग्ण मलेयिाचे आढळले होते. परंतु जुलै महिन्याच्या १५ दिवसातच २० रूग्ण पॉझीटीव्ह आढळले आहेत. टोयागोंदी या गावात तापाचे थैमान आहे. टोयागोंदी येथील सत्यभामा कुवरलाल लांजेवार (४०) या महिलेचा मलेरियाने मृत्यू झाला आहे. सालेकसा तालुक्याच्या जमाकुडो व दरेकसा उपक्रंद्रार्गत येणाऱ्या या चार गावांमध्ये मलेरियाचा उद्रेक होण्याची चिन्हे दिसत आहेत. आरोग्य विभागाने या गावात आतापर्यंत उपाय योजना केली नाही. जिल्हा हिवताप कार्यालय आता कृती आराखडा तयार करून उद्यापासून त्या गावांचे सर्वेक्षण करू असे विस्तार अधिकारी कुंभरे यांनी सांगितले. पाच वर्षात २६ बळी मागील पाच वर्षात मलेरियाने २६ जणांचा बळी गेला आहे. यंदा एका महिलेचा झाला. दरवर्षीच्या तुलनेत यंदा मलेरियाच्या रूग्णांमध्ये बऱ्याच प्रमाणात वाढ आहे?जिल्ह्यातील ३२९ आदिवासी व मलेरियाचा उद्रेक राहणाऱ्या गावात डासनाशक फवारणी करण्यात आली. गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलदृट्या संवेदनशील आहे. गोंदिया जिल्ह्यात सालेकसा व देवरी या दोन तालुक्यात मलेरियाच्या रूग्णांची संख्या सर्वाधीक आहे. ३६ गावात १२००० मच्छरदाण्या जिल्ह्यातील ३६ गावात १२ हजार मच्छरदान्या वाटप करण्यात आल्या आहेत.६ हजार ४२३ मच्छरदाण्या आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांना यंदा वाटप करण्यात आल्या आहेत. १३०० किलो डासनाशक फवारणी पावडर उपलब्ध आहे. मलेरियावर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी क्लोरोक्वीनच्या गोळ्या सर्व आशा स्वयंसेविकांकडे तसेच प्रत्येक गावातील जेष्ट नागरिकांकडे देण्यात आल्या आहेत. मलेरियावर दृष्टीक्षेप सन २०१२ मध्ये ४ लाख ४० हजार ७५५ रूग्णांची तपसणी केली. त्यात ७५४ रूग्ण आढळले. त्यातील ७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सन २०१३ मध्ये ४ लाख ४० हजार ८३६ रूग्णांची तपसणी केली. त्यात ५९४ रूग्ण आढळले. त्यातील ४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सन २०१४ मध्ये ४ लाख ९९ हजार ४८७ रूग्णांची तपसणी केली. त्यात १४६५ रूग्ण आढळले. त्यातील ९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सन २०१५ मध्ये ४ लाख ६७ हजार ८० रूग्णांची तपसणी केली. त्यात १४१५ रूग्ण आढळले. त्यातील ५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सन २०१६ मध्ये ४ लाख ९५ हजार २८६ रूग्णांची तपसणी केली. त्यात ९२० रूग्ण आढळले. त्यातील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. ५३४ गप्पी मासे केंद्र डास नियंत्रणासाठी डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी आरोग्य शिक्षण देण्यासाठी अतिसंवेदनशील भागात गटसभा घेण्यात येत आहेत. डास नियंत्रण करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपक्रेंद्रातंर्गत २६२ गप्पी मासे केंद्र व शहरात २७२ गप्पीमासे केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी नियमीत गप्पीमासे सोडण्याचे काम आरोग्य कर्मचाऱ्यांकडून होत असल्याची माहिती देण्यात आली.
चार गावात मलेरियाचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:03 AM