नरेश रहिले
गोंदिया: जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्तदृष्ट्या अतिसंवेदनशील असल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात गरोदर महिलांच्या तसेच लहान बालकांच्या आहार व आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. महिला गर्भावस्थेत असतांना तिला संतुलित आहार मिळत नसल्याने पोटातील गर्भ कुपोषित होत असतो. जन्माला येणारी बालके कुपोषित म्हणू जन्माला येत असल्याने त्या बालकांना सामान्य श्रेणीत आणण्यासाठी आरोग्य विभाग व महिला व बाल कल्याण विभागाला मोठे प्रयत्न करावे लागतात. धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे व लहान मुलांकडे दुर्लक्ष होत होते. परंतु कोरोनाच्या काळात पालकांनी आपापल्या पाल्यांकडे विशेष लक्ष दिल्यामुळे कुपोषणाचे प्रमाण घटले आहे. शहरी भागातील बालके गोल मटोल झाली आहेत. तर ग्रामीण भागातील कुपोषण हे कमी झाले आहे. याला एकच कारण आई-वडिलांनी कोरोनाच्या काळात आपल्या मुलांकडे विशेष लक्ष दिल्यामुळे त्यांच्या वजनात वाढ झाली आहे.
.........................
पालकांचीही चिंता वाढली
१) घरात दोन वर्षांपासून असलेली बालके फक्त जेवणे, झोपणे, व्हिडिओ गेम खेळणे, टीव्ही पाहणे हीच कामे करीत असल्याने त्यांच्या शरीराचा व्यायाम होत नाही. परिणामी खाणे आणि झोपणे यामुळे मुलांच्या वजनात मोठी तफावत पाहायला मिळत आहे. मुले लठ्ठ होऊ लागली आहेत. कमी वयात मुलांचे जास्त वजन वाढणे हे देखील धोक्याचे आहे.
- योगेश खोटेले डोंगरगाव.
..........
कोरोनाच्या भीतीमुळे आम्ही मुलांना घराबाहेर पडू दिले नाहीत. त्यामुळे खाणे आणि घरात राहणे यामुळे त्यांच्या शरीराचा व्यायाम होत नाही. परिणामी मुले लठ्ठ झालीत. आता मुलांचे कमी वयात वाढत असलेले वजन ही देखील दुसरी समस्या निर्माण होत आहे.
- राजू पटले, पालक आमगाव
....................
कारणे काय?
१) खाणे आणि झोपणे यामुळे मुलांच्या शरीराचा व्यायामच होत नसल्याने मुलांच्या शरीरातील फॅट वाढत चालले आहे.
२) कोरोनाच्या संकटामुळे घराबाहेर पडणे बंद झाले त्यामुळे घरात राहून घाम निघेल असे कोणतेही काम मुलांकडून होत नसल्याने त्यांचे वजन वाढत आहे.
३) शाळा बंद असल्याने मुलांच्या शरीराचा व्यायाम होत नाही. शाळा सुरू असल्यावर मुले आपल्या मित्र-मैत्रींसोबत दरवळणे, खेळणे, पळणे असे कृत्य करतात, त्यामुळे त्यांच्या शरीराचा आपोआपच व्यायाम होतो.
.....................
तज्ज्ञ काय म्हणतात?
मुलांना बाहेर खेळाला मिळत नाही. शरीराचा व्यायाम होत नाही. कित्येक तास एकाच ठिकाणी बसून व्हिडिओ गेम किंवा टीव्ही पाहात असतात. थोड्याथोड्या वेळाने घरी खायला मागत असतात. साखर व प्रथिने असलेल्या प्रदार्थ जास्त खात असल्यामुळे वजन वाढते.
डॉ. प्रदीप गुजर, बालरोग तज्ज्ञ गोंदिया.
.............
कोरोनाच्या काळात मुलांच्या आहाराकडे पालकांनी लक्ष दिले. मुलांना भरपूर विश्रांती मिळाली. यामुळे सहजरित्या त्यांच्या वजनात वाढ झाली. जेवण केल्यानंतर मेहनतीचे एकही काम मुलांकडून झाले नाही. त्यांचे खेळणेही बंद असल्यामुळे वजन वाढले आहे.
डाॅ. मीना वट्टी, आयुर्वेदिक तज्ज्ञ
..........
जिल्ह्यातील कुपोषित बालकांची आकडेवारी
कुपोषित- ३१२७
तीव्र कुपोषित- ५४४
...................
७७ बालकांना दुर्धर आजार
कुपोषणाच्या श्रेणीतील अतितीव्र श्रेणीत असलेल्या ५४४ पैकी ७७ बालकांना दुर्धर आजार आहे. त्या बालकांच्या आरोग्यात सुधारणा करण्यासाठी त्यांना पुनर्वसन बाल केंद्र (एनआरसी) मध्ये दाखल करण्यात आले आहे.
.........