बाराभाटी : कोणतेही पीक घेण्यापूर्वी आपल्या जमिनीला आवश्यक असलेली खते टाकण्याकरिता जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. त्याकरिता माती परीक्षण करूनच शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लागणारी आवश्यक खते वापरावीत, जेणेकरून कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेणे शेतकऱ्याला शक्य होईल, असे प्रतिपादन वरिष्ठ संशोधक डॉ. जी. आर. श्यामकुवर यांनी केले.
डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाअंतर्गत कृषी संशोधन केंद्र आयोजित उन्हाळी पिकाचे व्यवस्थापन भात लागवड तंत्रज्ञान या विषयावर कृषी मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. उद्घाटन प्रगतशील शेतकरी अण्णा पाटील डोंगरवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रगतशील शेतकरी देवराम कोरे, खुशाल काशिवार, मंडल कृषी अधिकारी प्रल्हाद मेश्राम, महाराष्ट्र पत्रकार संघाचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष सतीश कोसरकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आर. एफ. राऊत हे होते.
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या तैलचित्राचे पूजन माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी मंडल कृषी कार्यालयाचे मेश्राम यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. विकेल तेच पिकेल हा मंत्र त्यांनी याप्रसंगी शेतकऱ्यांना दिला. शेतकऱ्यांनी शास्त्राशिवाय शेती करू नये, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी गांडूळ खत, शेणखत व हिरवळीच्या खतांचा वापर करावा असे आवाहन प्रगतशील शेतकरी देवराम कोरे यांनी केले. सेंद्रिय व जैविक शेतीचा मंत्र याबाबत सतीश कोसरकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन याप्रसंगी केले. कृषी संशोधन केंद्राचे कार्य व शेतकऱ्यांना देण्यात येणारे मार्गदर्शन याविषयी सविस्तर माहिती प्राध्यापक आर. एफ. राऊत यांनी प्रास्ताविकातून दिली. कार्यक्रमाचे संचालन नवेगावबांध कृषी संशोधन केंद्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर एन. के. कापसे यांनी केले. आर. एफ. राऊत यांनी आभार मानले.