व्यापारी संकुलाचे गाडे कुणाचे? : स्मशानभूमीसाठी जागेचा अभावमुंडीकोटा : हे गाव अनेक समस्यांचे माहेरघर झालेले आहे. उखडलेल्या रस्त्यांमुळे अपघात, बाजार चौकातील अतिक्रमण व व्यापारी संकुलाचे गाडे या नित्याच्या समस्या होवून गेल्या आहेत. मात्र सदर समस्या सोडविण्याकडे संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे ठाम दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. मुंडीकोटा ते बस स्थानकाकडे हनुमान मंदिराजवळून जाणारा रस्ता संपूर्ण उखडलेला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडलेले असून ते अपघाताला आमंत्रण देत आहेत. दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र सद्यस्थितीत डांबर, गिट्टी व मुरूम कुठे गेला याचा पत्ताच लागत नाही. शिवाय या रस्त्यावरून नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे सदर रस्ता अपघाताला आमंत्रण देत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी सदर रस्त्याच्या दुरूस्तीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.घोगरा ते मुंडीकोटा रस्त्याच्या मागील भागात अनेक व्यक्तींनी अतिक्रमण केले आहे. तसेच या अतिक्रमणाच्या जागेत मोठ्या थाटात आपले व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे सोमवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराकरिता जागा कमी पडते. बाजार चौकातील हे अतिक्रमण हटविण्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असून हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. मुंडीकोटा येथील भंभोडी रेहो पुलाजवळ स्मशान शेड तयार करण्यात आलेला होता. पण चोरट्यांनी या शेडमधील प्रेत जाळण्याची लोखंडी शिडी लंपास केली. त्यामुळे शेडमध्ये सध्या प्रेत जाळता येत नाही. भंभोडी नाल्याच्या पुलाजवळ उन्हाळ्यात व पावसाळ्यात मोकळ्या जागेत प्रेत जाळले जाते. पावसात अनेकांची चांगलीच फजिती होते. पावसात प्रेत जळला किंवा नाही याची वाट पाहत बसावे लागते. परंतु या ठिकाणी बसण्यासाठी तसेच प्रेत जाळण्यासाठी कोणत्याही प्रकारची सोय नाही, असा हा घाट आहे.मुंडीकोटा ते घोगरा रस्त्याजवळ महात्मा गांधी व्यापारी संकुलाचे ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत सन १९९७-९८ या वर्षी १९ गाडे तयार करण्यात आले होते. या योजनेंतर्गत ते गाळे दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना वाटप करण्याची योजना होती. परंतु ते गाळे श्रीमंत व्यक्तींना देण्यात आले. या ठिकाणी श्रीमंत व्यक्तींचे व्यवसाय सुरू आहेत. दारिद्र्यरेषेखालील ज्या व्यक्तींना हे गाळे देण्यात आले, त्यांनी आपला व्यवसाय न करता दुसऱ्या व्यक्तींना अधिक पैसा घेवून भाडाने दिले आहेत. तर काहींनी आपले सामान ठेवण्याकरिता गोदाम तयार केले आहे. तर काही व्यक्तींनी गाळ्यांना कुलूप लावून ठेवलेले आहेत, असे अनेक गाळे बंद पडून आहेत. या गाळ्यांकडे अनेक महिन्यांपासून थकीत रक्कम बाकी आहे. पण कारवाई मात्र शून्य. गाळे कुणाचे व राहतो को? असा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा आहे. यावर मुंडीकोटा ग्रामपंचायत कार्यालयाने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. एखाद्या व्यक्तीने हे गाळे रिकामे केले तर ग्रामपंचायतची विचारपूस न करता या गाळ्यांत कोणताही व्यक्ती शिरून व्यवसाय करीत असतो. पण याकडे कोणत्याही अधिकाऱ्याचे लक्ष नाही. (वार्ताहर)
अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले मुंडीकोटा गाव
By admin | Published: October 09, 2015 2:15 AM