सत्ताधारी भाजप हतबल : सहकार क्षेत्रात नेत्यांची प्रतिष्ठा पणाला बोंडगावदेवी : तालुक्यातील सहकार क्षेत्रात महत्वपूर्ण व वर्षाकाठी कोटींच्या घरात उलाढाल करणाऱ्या अर्जुनी-मोरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून तालुक्यासह ग्रामीण भागातील सामान्य कार्यकर्त्यांनी दावेदारी केली. सत्ताधारी भाजप गटाला हादरा देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच भाजपातील असंतुष्ट कार्यकर्ते एकत्र येवून सर्वशक्तीनिशी लढत देण्याची व्युहरचना आखत असल्याचे बोलल्या जात आहे. एकंदरीत तालुक्यातील सहकार क्षेत्रात नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र दिसत आहे. संपूर्ण तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र पसरले आहे. वर्षाकाठी कोटींचा आर्थिक लेखाजोखा करणाऱ्या बाजार समितीवर आपले अधिराज्य प्रस्थापित करण्यासाठी तालुक्यातील नेते कामाला लागलेले आहेत. निवडणुकीच्या रणांगणात सत्ताधारी भाजप पॅनलला धडा शिकविण्यासाठी समविचारी नेते एकत्र येण्याची खेळी खेळून पॅनल उभी करण्याच्या कामात आहेत. सहकार क्षेत्रावर भाजप समर्थित नेत्यांचे अधिपत्य असल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत तालुक्यात भाजपाचे चांगले दिवस आहेत. हेच दृश्य डोळ्यासमोर ठेवून गावपातळीवरच्या कार्यकर्ते भाजप समर्थित पॅनलच्या प्रमुखांकडे उमेदवारी मागून दावेदारी केल्याचे दिसते. येत्या १६ आॅगस्ट रोजी होऊ घातलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील १०१ उमेदवारांनी नामनिर्देशन सादर केले होते. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांची छाणनी झाल्यानंतर ८६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. ३० जुलै उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख असून तेव्हा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. विपनन व प्रक्रिया मतदार संघातून सहकारी बॅकेचे संचालक केवळराम पुस्तोडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यशवंत परशुरामकर यांची लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकंदरीत कोटींच्या घरात उलाढाल करणाऱ्या बाजार समितीच्या निवडणुकीत अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसून आहे. (वार्ताहर)
बाजार समितीच्या निवडणुकीत अनेकांची दावेदारी
By admin | Published: July 29, 2015 1:28 AM