गोंदिया : हाताला काम नसल्याने श्रीमंत घरातील किंवा नोकरपेशांच्या घरातील धुणी व भांडी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मोलकरीण महिला गोंदिया शहरात हजाराच्या घरात आहेत. त्या महिलांच्या हातून ज्या घरातील धुणी व भांडी होत होती, आता त्याच घरात त्यांना कामावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. एक महिला ६-७ घरे फिरते म्हणून त्यांना कुणीच कामावर ठेवत नाही. त्यामुळे तळहातावर कमावून खाणाऱ्या महिलांना आता पोट भरणे कठीण झाले आहे. कोरोनाची धास्ती घेतलेल्या लोकांनी आता काम करणाऱ्या मोलकरीण महिलांना कामावर यायचे नाही, असे फर्मान काढले आहे. त्यामुळे लोकांच्या घरची धुणी व भांडी करून पोट भरणाऱ्या महिलांवर आता उपाशी राहण्याची वेळ आली आहे. ८० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी आपापल्या घरातील मोलकरीण महिलांना बंद केले आहे. कोरोनामुळे आम्हीच घरात जास्त वेळ घालवत असल्यामुळे शरीराला व्यायाम म्हणून आम्हीच घरातील कामे करू, असे ठरवून त्यांनी मोलकरणींचे काम करणे घरच्यांनीच सुरू केले आहे. त्यामुळे मोलकरीण महिलांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे.
........
घर चालवायचे कसे याची चिंता
तळ हातावर कमावून पोट भरण्याचा धंदा बंद पडल्याने आता दोन वेळचे जेवण करायचे कसे, ही चिंता त्यांना सतावत आहे. कोरोनापेक्षा भुकेची चिंता अधिक सतावत आहे. पहिल्या लाॅकडाऊनमध्ये सामाजिक संघटना, नेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक यांनी पुढे येऊन गोरगरिबांना मदत केली. परंतु यंदा कुणीही मदत करायला पुढे आला नाही. त्यामुळे पोट कसे भरावे, काम नाही, कुणाची मदत नाही, याची चिंता त्यांना सतावत आहे.
....
एका घरातून मिळतात ७०० रूपये
एक महिला दररोज ६-७ घरी मोलकरीण म्हणून काम करते. एका घरातून महिन्याकाठी ७०० रुपये मिळतात. महिन्याकाठी पाच हजारांच्या घरात येणाऱ्या मिळकतीतून आपला संसार रेटण्याचा खटाटोप सुरू असताना कोरोनाचा संसर्ग वाढल्याने हातातून काम गेले. आता घरातच राहात असल्याने पोट कसे भरणार, असा पेच त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.
.....
पाच तोंडाचे पोट भरणार कसे?
(१) कोरोनामुळे आमच्या हाताला काम नाही. ज्यांच्या घरून आमची रोजी रोटी चालत होती, ती रोजी-रोटी कोरोनाने हिसकावली. एकाच घरात ५ सदस्य असून, सर्वांचे पोट भरणे खूप मोठी कसरत आहे. कुणीही काम द्यायला तयार नाही. त्यामुळे चिंता सतावत आहे.
- भागरथाबाई भांडारकर, मोलकरीण महिला
....
(२) कोरोनापूर्वी आम्हाला खूप मागणी होती. अनेक घरात आम्हाला कामासाठी बोलावले जात होते. तेव्हा आम्हालाच वेळ मिळत नव्हता. त्यामुळे अधिक पैसे मोजायला कुणीही तयार होते. परंतु आता आम्हाला कामावर येऊ नका, असे म्हटले जाते. आतापर्यंत ज्यांच्या घरचे काम केले, त्यांनीही आम्हाला आता कामावर येऊ नका, असे सांगितले. त्यामुळे जगावे कसे, हा प्रश्न आहे.
- पुस्तकला नेवारे, मोलकरीण महिला
.....
(३) घरात भरपूर लोक आहेत. परंतु हाताला काम नाही. कोरोनाच्या नावावर हातातील रोजगार हिरावला. कुणी कामावर येऊ द्यायला तयार नाही. हाताला कामच नाही तर पोट भरायचे कसे, हा प्रश्न उदभवला आहे. सरकारने मदत केली नाही. मालक कामावर येऊ देत नाही. हातात पैसे नाही, जमीन नाही मग पोट भरायचे तरी कसे, हा प्रश्न आमच्यापुढे आहे.
- निर्मला रामटेके, मोलकरीण महिला.
........
कुटुंबासमोर अडचणी
हाताला काम नाही, हातात पैसे नाहीत. ही सर्वात मोठी अडचण गोरगरिबांपुढे आहे. कोरोनाच्या संकटापेक्षा पोटाचे संकट हे त्यांना मोठे वाटत आहे. कोरोनाने मरणाच्या भीतीने उपाशी राहून मरण्याची वेळ गोरगरिबांवर आली आहे.
.......
शहरातील मोलकरणींची संख्या- १२६०
शहरातील मोलकरणींच्या हाताला मिळेना काम- ९८०