गोंदिया : राज्यात सध्या शासकीय अधिकारी असो की कर्मचारी मोठ्या मानसिक तणावात नोकरी करीत असताना दिसून येत आहे. गेल्या मार्च महिन्यात ३ महिला अधिकाऱ्यांनी आपली जीवनयात्रा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला व मानसिक तणावामुळे संपविली. त्यातच गोंदिया जिल्ह्यातील एका ग्रामविकास अधिकाऱ्यांनेही सरपंच पतीच्या त्रासामुळे आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. तर असाच काही प्रकार जिल्हा परिषदेत सुरू असून कर्मचारी तणावाखाली काम करीत आहे.
जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात कार्यरत असलेले लिलेंद्र पटले यांची आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे सेवा घेण्यात आली असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांना कार्यमुक्त केले आहे. त्यामुळे एकच कर्मचारी दोन-दोन विभागाचे कामे कसे करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. पटले यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागातून कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या मोबाइलवरून बोलावून तुला येथेच काम करावे लागेल, जर काम करायचे नसेल तर आपला राजीनामा दे असे बोलल्याचा आरोप आहे. त्यामुळे पटले हे खूपच मानसिक तणावात आलेले आहेत. त्यातच उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली असून त्या नोटीस आधीच पटले यांनी आपल्या वरिष्ठांना आणि पत्नीच्या नावे पत्र लिहीत मानसिक त्रासामुळे तणावात असून माझे काही बरे वाईट झाले तर विभागप्रमुखच त्याला जबाबदार राहणार असा उल्लेख केल्याचे जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी योग्य ती कारवाई करण्याची मागणी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जि.प. मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रातून केली आहे.
.........
जिल्हा परिषदेत यापूर्वी देखील तक्रार
जिल्हा परिषदेत वरिष्ठांकडून कर्मचाऱ्यांना त्रास दिला जात असल्याच्या घटना यापूर्वी देखील घडल्या आहे. मागील वर्षीच एक प्रकरण चांगलेच गाजले होते. अखेर यात जि.प.चे पदाधिकारी आणि संघटनानी पुढाकार घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे अशा घटनांना वेळीच पायबंद लावण्यासाठी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाई करण्याची गरज आहे.