आमगाव : तालुक्यातील फुक्कीमेटा येथील विद्यार्थिनींचा तेथील जि.प.शाळेच्या शिक्षकाकडून लैंगिक छळ झाल्याच्या प्रकरणाने शैक्षणिक वातावरण ढवळून निघाले असताना अशाच पद्धतीने इतरही शिक्षकांकडून छळ होत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. मात्र त्यावर अद्याप कोणतीही कारवाई जि.प. प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही.जिल्हा परिषदेच्या शाळांमधील अनेक शिक्षकांविरुद्ध तक्रारींची फाईल शिक्षण विभागात धुळखात असल्याने त्या शिक्षकांचे मनोबल वाढले आहे. शिक्षकांविरूद्धच्या तक्रारीकडे अधिकारी व पदाधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे विद्यार्थी, पालकांना न्याय मिळत नसल्याची वस्तुस्थिती दिसून येते. काही शिक्षकांची तक्रारी खंडविकास अधिकारी ते मुख्य कार्यपालन अधिकारी व पदाधिकारी यांच्यापर्यंत करण्यात आल्या असल्याची माहिती आहे. आमगाव पंचायत समितीअंतर्गत जिल्हा परिषदांच्या ११६ शाळा आहेत. या शाळांमध्ये ४३० महिला व पुरुष शिक्षक आहेत. या शाळेतील अनेक शिक्षक आपले कर्तव्य पणाला लावून कार्य करीत आहेत. परंतु काही शिक्षक कर्तव्याच्या नावावर राजकीय छत्रछायेत गैरमार्गाकडे वळल्याचे चित्र आहे. त्यांच्या तक्रारींवर वजन कुणाचे, असा प्रश्न पालकवर्गाला पडला आहे. यातूनच अखेर न्याय मिळत नसल्याने या शाळांमधील आस्था दुरावत असून विद्यार्थी, पालक खासगी शाळांकडे वळत आहेत. (शहर प्रतिनिधी)तक्रारींची दखल घेणार - शिक्षणाधिकारी४शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना आमगाव तालुक्यातील फुक्कीमेटा या जिल्हा परिषद शाळेत घडली आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांचे बिंग फुटण्याची शक्यता आहे. याविषयी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उल्हास नरड यांना विचारणा केली असता त्या तक्रारींवर लवकरच कारवाई होणार असून फुक्कीमेटा येथील अहवाल प्राप्त होताच तत्काळ कारवाई करणार, अशी माहिती त्यांनी दिली.
अनेक जि.प. शिक्षकांच्या तक्रारींची फाईल धूळ खात?
By admin | Published: April 05, 2016 4:12 AM