गोंदिया : मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने शुक्रवारी (दि.३) येथील प्रशासकीय इमारतीसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.
जिल्ह्यातील ७० टक्के मराठा समाज बांधवांची आर्थिक स्थिती मजबूत नाही. आजही समाजातील काही लोक मोलमजुरी करीत असल्यामुळे त्यांना आपल्या मुलांना उच्च शिक्षण देणे शक्य नाही. अशात मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणे गरजेचे असून मराठा समाजाचा तो अधिकार आहे. यासाठीच येथील सकल मराठा समाजाच्यावतीने शुक्रवारी (दि.३) राज्यात सरसकट मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन देत एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, उपविभागीय अधिकारी पाटील यांना सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात महेंद्र तुपकर, दीपक कदम, रमेश दलदले, आलोक पवार, अविनाश पवार, सीमा बढे, श्रृती केकत, महेंद्र माने, संतोष पवार, राजेंद्र जगताप, पंकज सावंत, मुरलीधर पवार, जयंत शिंदे, पंकज तुपकर, विनीत मोहिते, रेखा इंगळे, मनीषा पवार, भावना कदम, योजना कोतवाल, वंदना घाटे, अलका सुरसे, विवेक जगताप, मोहन कोतवाल, मिलिंद पवार, प्रमोद इंगळे, हेमेंद्र तुपकर, प्रतिभा शिरगरे, धर्मराज काळे, देवेंद्र जगताप, अभय सावंत, कपिल केकत यांच्यासह मोठ्या संख्येत मराठा समाजबांधव उपस्थित होते.
आरक्षणाचा निर्णय त्वरित घ्यावा
- मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी अवघ्या राज्यातच आंदोलन सुरू असून अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. मात्र आता मराठा समाज गप्प बसणार नसून आरक्षणाचा निर्णय त्वरित घेण्यात यावा अशी मागणी मराठा समाजबांधवांनी या धरणे आंदोलनातून रेटून धरली.