केशव मानकर : धान उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कारआमगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती आमगाव येथे तालुक्यातील हंगामी धान उत्पादक शेतकऱ्यांनी प्रथम धान्य विक्रीसाठी बाजार समितीमध्ये आणले. अशा धान उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार बाजार समिती यार्डमध्ये करण्यात आला.अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती माजी आ. केशवराव मानकर होते. प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती रवी अग्रवाल, संचालक संजय नागपुरे, युवराज बिसेन, विनोद कन्नमवार, रामेश्वर श्यामकुंवर, विकास महारवाडे, राजेश डोंगरवार, टीकाराम मेंढे, सचिव सुभाष चव्हाण, यशवंत चुटे उपस्थित होते. तालुक्यात पावसाळी हलके धान पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कष्टाचे सोने केले. या धानपिकांची मळणी करुन श्ेतकऱ्यांना योग्य भाव मिळावे यासाठी आमगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणले. पावसाळी धान पीक विक्रीसाठी बाजार समितीत दाखल झालेल्या शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ व एक हजार रुपये प्रत्येकी रोख देऊन सभापती तथा माजी आमदार केशवराव मानकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात सचिव सुभाष चव्हाण यांनी, शेतकरी हा सजग झाला असून खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी सक्षम ठरला आहे. त्यामुळे त्याला मिळणारे मूल्य बाजार समितीद्वारे अधिक मिळते. बाजार समिती शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी सक्षमपणे कार्यरत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी केशवराव मानकर यांनी शेतकरी हा सक्षमपणे समर्थ असला पाहिजे. यासाठी शासनाने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी कुशलतेने पावसाळी धानपीक अधिक प्रमाणात घेतले आहे. त्यांच्या धानपिकाला बाजार समितीत योग्य भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांनी आशावादी असावे. बाजार समिती शेतकऱ्यांचीच धरोहर आहे. या बाजार समितीच्या माध्यमाने शेतकऱ्यांमध्ये न्यायाची भावना रूजेल, असे आशावादी मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात व्यापारी सावलराम अग्रवाल, नितीन अग्रवाल, आडत्या तारेंद्र बहेकार, सुरेंद्र अग्रवाल, रामा बहेकार, विजय बहेकार, किशोर बोळणे, अनिल बिसेन उपस्थित होते. संचालन व आभार यशवंत चुटे यांनी केले. कार्यक्रमासाठी गजेंद्र चुटे, मेश्राम, राहुल साखरे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
बाजार समिती शेतकऱ्यांची धरोहर
By admin | Published: October 07, 2016 2:00 AM