गोंदिया : येथील श्री टाॅकीज मार्गावर असलेल्या ए टू झेड महासेल दुकानाला शुक्रवारी (दि.१८) धुळवडीच्या दिवशी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शाॅर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील संपूर्ण साहित्य जळून राख झाले. पाच तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले. मात्र, या आगीची झळ काही प्रमाणात बसल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार गोरेलाल चौकात बजरंग दल कार्यालयासमोर ए टू झेड महासेलचे दुकान एका इमारतीत आहे. ही इमारत वर्दळीच्या ठिकाणी आहे. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास या इमारतीतून धूर निघताना काही नागरिकांना दिसला. त्यांनी लगेच याची माहिती अग्निशमन दल आणि शहर पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर गोंदिया अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने आणि लगतच्या इमारतींना आग लागण्याची शक्यता वाढल्याने तिरोडा नगर परिषद अग्निशमन आणि अदानी वीज प्रकल्पाच्या अग्निशमन वाहनांची मदत घेण्यात आली.
या दुकानात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे साहित्य आणि कपडे होते. त्यामुळे या आगीने रौद्ररूप धारण केले. गोंदिया, तिरोडा आणि अदानी वीज प्रकल्पाच्या अग्निशमन वाहनांची मदत घेत ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. २५ अग्निशमन वाहनांच्या मदतीने रात्री ११ वाजेच्या सुमारास ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र, यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग लागल्याची माहिती कळताच घटनास्थळी माजी आ. राजेंद्र जैन, रवी ठकरानी, गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांच्यासह अग्निशमन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होत आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते. आग आटोक्यात येईपर्यंत या सर्वांनी घटनास्थळीच तळ ठोकला होता.
ते ७ जण सुरक्षित
ए टू झेड महासेलच्या ज्या इमारतीला आग लागली त्यात सेलमध्ये काम करणारे सात जण आतमध्ये होते. मात्र, आग लागताच हे सातही जण सुखरूप बाहेर पडले. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली.
तर बाजारपेठच आगीच्या विळख्यात
ए टू झेड महासेलच्या इमारतीला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केल्याने लगतच्या हॉटेललासुद्धा या आगीची झळ बसली. यालाच लागून आठ ते दहा दुकाने आहेत. जर आग वेळीच आटोक्यात आली नसती तर या परिसरातील आठ ते दहा दुकानांची राखरांगोळी झाली असती. अग्निशमन दलाच्या जवांनानी तब्बल पाच तास प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.
फायर ऑडिटवर प्रश्नचिन्ह
शहरात आगीच्या घटना नवीन नाहीत. पाच ते सहा वर्षांपूर्वी शहरातील एका हॉटेलला आग लागून ११ जणांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतरही फायर ऑडिट करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ज्या ठिकाणी ए टू झेड महासेलचे दुकान होते त्या ठिकाणी फायर ऑडिट झाले नसल्याचे बाेलले जाते. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या इमारतीच्या फायर ऑडिटकडे दुर्लक्ष केल्याने जात असल्याने शहरवासीयांवरील धोका कायम आहे.
शार्टसर्कीट की आणखी काही
ए टू झेड महासेलच्या दुकानाला शुक्रवारी शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याचे बोलले जाते. मात्र, ही आग शाॅर्टसर्किटमुळेच लागली की आणखी काही कारण आहे हे चौकशीत ते स्पष्ट होईल. तपास पोलीस करीत आहेत.