राजेश मुनीश्वर
सडक अर्जुनी : तालुक्यातील खोडशिवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर गहाणे यांनी स्वतःच्या खिशातून ५५ हजार रुपयांचे विविध साहित्य विकत घेऊन, आपल्या कर्मचाऱ्यांची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काळजी घेण्यासाठी पुरवठा करून मानवतेचा परिचय दिला आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाची महामारी सुरू आहे. विविध विभागाचे कर्मचारी जिवाची पर्वा न करता, खेड्यापाड्यांतील जनतेची काळजी घेत आहेत. कोरोना लसीकरण, गृहभेटी देणे, गरोदर मातांची आरोग्य तपासणी, कोरोना सेंटरवर कर्तव्य बजावणे, आदी आरोग्याविषयी कर्तव्य बजावताना दिसत आहेत. जनतेची काळजी घेत असताना मात्र आरोग्य विभागाकडून कर्मचाऱ्यांच्या जिवाची काळजी घेण्यासाठी कुठल्याच सोयीसुविधा त्या कर्मचाऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अशात काही डॉक्टर स्वत:हून मदतीसाठी पुढे येत आहेत. असा पुढाकार घेत डॉ. समीर गहाणे यांनी आपल्या खिशातून ५५ हजार रुपये खर्च करून आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. यात पल्स ऑक्सिमीटर १२, सॅनिटाझर पाच लिटर, हॅन्डग्लोव्हज १५००, एन ९५ चे ४०० मास्क, फेस शिल्ड ६७ हे साहित्य वाटप करण्यात आले. साहित्य वाटप करण्यासाठी अरुण उदापुरे, के. डी. मुनेश्वर, एल. के. चचाने, सुदाम बिंबेकर या कर्मचाऱ्यांनी साहित्य वाटप करण्यासाठी मदत केली. खोडशिवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात नऊ उपकेंद्रे व दोन दवाखाने असून ७० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात आशा वर्कर स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची काळजी घेत आहे.
शासनाने सर्वांत आधी आरोग्य कर्मचारी यांच्या सुरक्षेचा विचार करण्याची गरज आहे. संपूर्ण जिल्ह्यात असे स्वतः पुढाकार घेऊन स्वतःचे खिशातून पैसे खर्चून आरोग्य साहित्य वाटप करण्याचा उपक्रम राबविणारे डॉ. गहाणे हे जिल्ह्यातील पहिले डॉक्टर असावेत. त्यांच्या कार्याचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे.