नरेश रहिले ।ऑनलाईन लोकमतगोंदिया : जिल्हा परिषद शाळांमधील पहिली ते आठवीच्या भाषा व गणित विषयाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था व जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून अध्ययन निश्चिती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ६० दिवसांच्या या कार्यक्रमात भाषा व गणितात माघारलेल्या विद्यार्थ्यांना तरबेज करण्यासाठी गुणवत्ता विकास कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.जिल्ह्यात पहिली ते आठवीचे जिल्हा परिषदेच्या शाळेत भाषा विषयासाठी ७२ हजार ६२८ विद्यार्थी तर गणित विषयासाठी ७२ हजार ८५ विद्यार्थी आहेत. या प्रत्येक बालकाला भाषा श्रवण, वाचन, संभाषण प्रत्येक विद्यार्थ्याला करता यावे, गणित विषयाचे अंज्ञान, संख्याज्ञान, बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार विद्यार्थ्यांना करता यावा. यासाठी अध्ययन निश्चिती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी प्रत्येक केंद्र स्तरावर सीआरजी व तालुकास्तरावर बीआरजीची स्थापना करण्यात आली. यात भाषा व गणित विषयासाठी तज्ज्ञ व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. केंद्रानुसार प्रत्येक महिन्याच्या ३ तारखेला मंथन सभा घेण्यात येत आहे. दर २० दिवसानंतर मुलांचे अध्ययनस्तर निश्चित कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यात किती विद्यार्थ्यांत सुधार झाली याचा आढावा घेण्यात येणार आहे.त्यानंतर जे काम अपुरे राहीले त्यावर पुढची रणनिती आखली जाणार आहे. मागसालेल्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी या कृती कार्यक्रमाची अमंलबजावणी सुरू केली आहे. अध्ययन निश्चिती कार्यक्रमाचा पहिला टप्पा २२ ते २५ जानेवारी होता. दुसरा टप्पा २२ ते २५ फेब्रुवारी, तिसरा टप्पा २२ ते २५ मार्च व चवथा टप्पा २२ ते २५ एप्रिल असा राहणार आहे. पहिल्या टप्प्यात गोंदिया जिल्ह्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थी भाषा व गणित विषयात किती मागासले आहेत याची माहिती घेण्यात आली. दुसºया टप्प्यापासून मागासलेल्या विद्यार्थ्यांची किती प्रगती झाली याचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.झिरो बजेटचा उपक्रमभाषा व गणितात मागासलेल्या विद्यार्थ्यांना तरबेज करण्यासाठी गुणवत्ता विकासाचा हा कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी अमंलबजावणीसाठी एका तालुक्यात बीआरजी स्तरावर २० तर सीआरजी स्तरावर १२ असे एका तालुक्यात ३२ तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे आठही तालुक्यात २५६ तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या शाळेतील शिक्षक आपल्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला भाषा व गणीताचे ज्ञान असावे यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यांचे प्रयत्न कुठे कमी पडत असतील तर त्यांना या तज्ज्ञांची मदत घेता येईल. शासनाच्या कुठल्याही आर्थिक मदतशिवाय हा उपक्रम राबविण्यात येत आहे.७० टक्के विद्यार्थ्यांना भागाकार येत नाहीजिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन केल्यानंतर भाषा विषयासाठी २ टक्के मुले शिक्षणपूर्व तयारीतच नसल्याचे पुढे आले. ५ टक्के विद्यार्थी श्रवणासाठी तयार नाहीत, १७ टक्के बालकांना भाषण,संभाषण येत नाही. तर २३ टक्के विद्यार्थ्यांना वाचन करता येत नाही. गणितासाठी ३ टक्के विद्यार्थ्यांना अंकज्ञान नाही, ५ टक्के विद्यार्थ्यांना संख्याज्ञान नाही, ९ टक्के विद्यार्थ्यांना बेरीज येत नाही, २० टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी येत नाही, ५३ टक्के विद्यार्थ्यांना गुणाकार येत नाही तर ७० टक्के विद्यार्थ्यांना भागाकार येत नसल्याचे पुढे आले.भाषा व गणितात माघारलेल्या विद्यार्थ्यांना वाचता यावे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करता यावा. यासाठी जि.प.च्या सर्व शाळांत अध्ययनस्तर निश्चिती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अवघ्या ६० दिवसात या संपूर्ण बालकांना हे सर्व सहजरित्या करता येईल यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत.- राजकुमार हिवारे,प्राचार्य डीआयईसीपीडी गोंदिया.
गणितात विद्यार्थी होणार स्मार्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 11:40 PM
जिल्हा परिषद शाळांमधील पहिली ते आठवीच्या भाषा व गणित विषयाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था व जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून अध्ययन निश्चिती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
ठळक मुद्देडीआयईसीपीडी चा पुढाकार : ६० दिवसांचा कार्यक्रम