लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे २०२० हे संपूर्ण वर्ष टेन्शन आणि संकटात गेले. कोरोनामुळे जवळपास सात-आठ महिने नागरिकांना घरीच कोंडून राहावे लागले. त्यामुळे हे वर्ष सर्वांसाठी सदैव स्मरणात राहणार आहे. २०२० हे वर्ष संपले असून २०२१ या नववर्षातील पहिला दिवस शुक्रवारी उजाडला. मागील वर्षात जे झाले ते झाले मात्र हे वर्ष सुख समाधानाचे आणि आरोग्यसंपन्न जावे यासाठी अनेकांनी मंदिरात दर्शन घेऊन देवाला साकडे घातले.मागील वर्षात कोरोनामुळे काही चांगले तर काही वाईट अनुभव आले. हे संपूर्ण वर्षच कोरोनाच्या संकटाने गाजले. यामुळे उद्योगधंदे बंद असल्याने अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. अनेकांना हजारो किमीचा पायी प्रवास करून स्वगृही परतावे लागले. तर दुसरीकडे अपघात व गुन्हेगारी घटनांनीही जिल्हा गाजला. एकंदर मागील वर्षात रोज काही ना काही ऐकायला आले. मात्र २०२१ या नववर्षात असे काही अभद्र ऐकायला येऊ नये. मागील वर्षी झाले ते झाले, चुकांना पदरात पाडून व हे वर्ष कुशल, मंगल आणि आरोग्यसंपन्न जावे अशीच सर्वांची मनोकामना आहे. यासाठी देवाला साकडे घालण्यासाठी आणि नववर्षाची सुरुवात मंगलमय करण्यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी (दि.१) नागरिकांनी मंदिर, मशीद, गुरुद्वारा व चर्चमध्ये जाऊन प्रार्थना केली.
नवीन वर्षांचे सेलिब्रेशन घरातच २०२० ला बाय बाय करण्यासाठी थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन पार्टी केली जाते. मात्र यंदा कोरोनामुळे शासनाने काही निर्बंध लागू केले होते. तसेच घरीच राहून सेलिब्रेशन करण्याचे आवाहन केले होते. याला जिल्हावासीयांनी प्रतिसाद देत घरात राहूनच सेलिब्रेशन साजरे केले. शुक्रवारी सकाळी नवीन वर्ष सुख, समृद्धी व समाधानात जावे यासाठी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.