लोकमत न्यूज नेटवर्क सडक-अर्जुनी : येथील नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्यांनी आपली नैतिक जबाबदारी समजून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. दुसऱ्या नगरसेवकांना पुढील विकास कामाकरिता संधी द्यावी, असा सूर शहरवासीयांकडून आळवला जात आहे.
नगरपंचायत सडक अर्जुनीच्या निवडणुका सन २०२२ मध्ये घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर अडीच वर्षांकरिता नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी निघाले होते. अडीच वर्षांकरिता अध्यक्ष म्हणून तेजराम मडावी व उपाध्यक्ष म्हणून वंदना डोंगरवार यांची निवड करण्यात आली होती.
लोकशाहीमध्ये निवडणुका घेणे शासनाचे कर्तव्य आहे; परंतु राज्यातील निवडणुका शासनाने लांबणीवर टाकल्या, तसेच महाराष्ट्रातील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांचा कालावधी अडीच वर्षांऐवजी पाच वर्षे करण्याचा निर्णय १३ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. याचा फटका महाराष्ट्रातील १०५ नगरपंचायतींना बसला.
राज्य सरकारने निवडून आलेल्या नगरसेवकांच्या विरोधात जरी निर्णय घेतला असला तरी आपली निवड ही अडीच वर्षांकरिताच होती व नियमानुसार आपल्या पदाचा कालावधी संपला आहे. आता आपण त्याच प्रवर्गातील दुसऱ्या नगरसेवकाला अडीच वर्षे संधी द्यायला पाहिजे, ही नैतिकता जोपासून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व दुसऱ्यांना संधी द्यावी, असा सूर नगरसेवक व शहरवासीयांकडून आळवला जात आहे.
त्यांनी दिला राजीनामा सिंदेवाही नगरपंचायतीची निवडणूक अडीच वर्षापूर्वी झाली होती तिथे नगराध्यक्ष म्हणून भास्कर नन्नावार व उपाध्यक्ष म्हणून पूजा रामटेके यांची निवड झाली होती. नियमानुसार आपला अडीच वर्षांचा कालावधी संपल्यामुळे आपली नैतिक जबाबदारी समजून नगराध्यक्ष नन्नावार आणि उपाध्यक्ष रामटेके यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन इतर नगरसेवकांना संधी मिळावी याकरिता एक नवीन आदर्श निर्माण केला. असाच आदर्श सडक अर्जुनी येथील नगराध्यक्षांनी घ्यावा, अशी मागणी देखील केली जात आहे.
"मी स्व-मर्जीने नगराध्यक्षपदावर कायम नाही तर शासनाने वाढविलेल्या कार्यकाळामुळे आहे. मला माझ्या पक्ष श्रेष्ठींनी राजीनामा देऊन पदावरून दूर होण्यास सांगितल्यास निश्चितच मी त्याचे पालन करणार. मात्र, त्यापूर्वी कुणी मागणी करतेय म्हणून मी राजीनामा देणार नाही. मी शासनाच्या नियमानुसारच पदावर कायम आहे."- तेजराम मडावी, नगराध्यक्ष, सडक अर्जुनी