सोनपुरी : शासकीय एमसीव्हीसी उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाचे रूपांतर आयटीआयमध्ये होत असले तरी खासगी अनुदानित महाविद्यालयात हे अभ्यासक्रम सुरूच राहणार आहेत. चालू वर्षी विद्यार्थ्यांना त्यात प्रवेश घेण्यास काहीही अडचण नाही असे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य व्होकेशनल टिचर्स असोसिएशनचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रवीण मानापुरे व जिल्हा सिचव प्रा. जागेश्वर लिल्हारे यांनी दिले. शिष्टमंडळाने औरंगाबाद येथे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या सहसंचालकांची भेट घेतल्यानंतर शिष्टमंडळाला याबाबत आश्वासन दिले.
केंद्र शासनाकडून एमसीव्हीसी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमासाठी बांधकाम, यंत्रसामग्री याकरिता एकदाच अनुदान दिले आहे. त्यानंतर अभ्यासक्रमात दोनदा सुधारणा करून ही अनुदान दिले नाही. इतकेच नव्हे तर अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता २० वरून वाढवून ३०-४० केली. मात्र त्या तुलनेत जादा कर्मचारी भरती केली नाही. अशा परिस्थितीत खासगी अनुदानित महाविद्यालयातील एमसीव्हीसी अभ्यासक्रम चालविण्यात अडचण येत आहेत. प्रयोगशाळा, शैक्षणिक साहित्यासाठीचे अनुदान अद्यापही महाविद्यालयांना मिळालेला नाही. एवढेच नव्हे तर खासगी संस्थामधील तासिका तत्त्वावरील शिक्षकांना ७२ रुपये प्रति तास मानधन देण्यात येते. त्या वाढविण्याची संघटनेने केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मानधन वाढ करण्यात आली नाही. याबाबत आमदार विक्रम काळे यांच्या अध्यक्षतेखाली उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम रूपांतरण समिती निर्माण करण्यात आली. परंतु अद्यापही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहवाल तयार होऊ शकला नाही.
बाॅक्स....
रिक्त पदे भरून मानधन वाढवा
राज्यातील एमसीव्हीसी विभागातील शिक्षकांचे अनेक पदे रिक्त असून विद्यार्थ्यांचा शिक्षणावर परिणाम होत आहे. काही वर्षांपासून एकाच शिक्षकावर व्होकेशनल अभ्यासक्रम सुरू असून काही महाविद्यालयात दोन्ही शिक्षक नाहीत. त्यामुळे शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत. शासनाने एमसीव्हीसी वगळता सर्वच अभ्यासक्रमातील तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या मानधनात वाढ केली आहे. शासकीय तंत्रनिकेतन, आयटीआयमधील तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या मानधनात वाढ केली असताना एमसीव्हीसी अभ्यासक्रमाबाबत मात्र दुजाभाव करण्यात येत आहे, अशी वागणूक बंद करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे.