गोंदिया : पेट्रोल, डिझेल पाठोपाठ गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ केली जात आहे. केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांनी वाढ केली. त्यामुळे १४ किलोच्या गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना आता ९३० रुपये मोजावे लागत आहेत. मागील आठ महिन्याच्या कालावधीत गॅस सिलिंडरचे दर १८० रुपयांनी वाढल्याने सर्वसामान्यांना याचा फटका सहन करावा लागत आहे. सततच्या दरवाढीमुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी सुद्धा गॅस सिलिंडरचा वापर बंद करुन आपला मोर्चा चुलीकडे वळविला आहे. गॅस सिलिंडरची दरवाढ आणि महागाईमुळे गृहिणींचे बजेट बिघडले असून महिन्याचा खर्च चालवायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. चुलीपासून मुक्तीचे स्वप्न दाखविणाऱ्या केंद्र सरकारने गॅस सिलिंडरची दरवाढ करुन पुन्हा चुलीकडे वळण्यास भाग पाडले आहे.
..........
आठ महिन्यात १८० रुपयांची वाढ
जानेवारी :
फेब्रुवारी :
मार्च :
एप्रिल :
मे :
जून :
जुलै :
ऑगस्ट :
......................
सबसिडी बंद, दरवाढ सुरुच
केंद्र सरकारकडून गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ केली जात आहे. मात्र दुसरीकडे अनुदानात तेवढ्याच झपाट्याने कपात केली जात आहे. गॅस सिलिंडरसाठी ९३० मोजल्यानंतर ग्राहकांच्या खात्यावर अनुदानापोटी केवळ ४६ रुपये जमा केले जात आहेत. तर बऱ्याचदा ही सबसिडीची रक्कम जमा केली जात नाही. त्यामुळे सबसिडी बंद पण दरवाढ सुरुच असे चित्र आहे.
............
छोट्या सिलिंडरच्या दरात वाढ
- १४ किलो सिलिंडरच्या दरात नुकतीच २५ रुपयांनी तर ५ किलोच्या छोट्या सिलिंडरच्या दरात ७ रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे यासाठी ग्राहकांना आता ३४३.५० पैसे मोजावे लागणार आहेत.
- मागील आठ महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होत असल्याने ६७० रुपयांवर दर ९३० रुपयांवर पोहोचले आहेत.
- गॅस सिलिंडरचे दर आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे त्यांनी चुलीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
- उज्ज्वला योजनेचे ८० टक्के लाभार्थी गॅस सिलिंडरवरुन पुन्हा चुलीकडे वळले असून शासनाने दिलेले सिलिंडर धूळखात पडले आहे.
.........
व्यावसायिक सिलिंडर ७ रुपयांनी स्वस्त
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर केंद्र सरकारने २५ रुपयांनी वाढविले. तर व्यावसायिक सिलिंडरचे दर ७ रुपयांनी कमी केले आहे. त्यामुळे व्यावसायिक सिलिंडरचा वापर करणाऱ्या ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
..............
शहरात चुली पेटावयाच्या कशा
वाढत्या महागाईने आधीच आमचे कंबरडे मोडले आहे. त्यातच गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे; मात्र त्यासाठी लागणारे सरपण सुध्दा उपलब्ध होत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.
- श्वेता मस्के, गृहिणी
...............
कोरोनामुळे आधीच अनेकांचा रोजगार हिरावला आहे. तर कसेबसे करुन कुटुंबाचा गाडा पुढे रेटत आहे. अशात गॅस सिलिंडरच्या वाढत्या दराने कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- लिना कोकाटे, गृहिणी.
...........