लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्याचा पारा आता ४१ अंश सेल्सिअस पार जात असून तीव्र उन्हामुळे जिल्हावासीयांना बाहेर पडणे कठीण होत आहे. अशा या तीव्र उन्हात उष्माघाताचा धोका वाढत असून दुर्लक्ष केल्यास कित्येकदा रुग्णाचा जीव सुद्धा जातो. हीच बाब लक्षात घेत येथील वैद्यकीय महाविद्यालयाने उष्माघात कक्ष तयार केला आहे. ४ बेडची व्यवस्था असलेला उष्माघात कक्ष औषध व अन्य सोयींनी सज्ज आहे. यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्य तापू लागला आहे. हेच कारण आहे की, मार्च महिन्यातच पारा ४१ अंशावर गेल्याचे दिसले. त्यात आता मार्च महिना संपला असून एप्रिल महिन्याला सुरुवात झाली व खऱ्या अर्थाने उन्हाळा सुरू झाला आहे. मात्र, उन्हाळ्याची सुरुवातच तीव्र उन्हाने झाली असून सूर्य आतापासूनच आग ओकताना दिसत आहे. शनिवारी (दि.१) जिल्ह्याचे तापमान ४१.६ अंश सेल्सिअसवर गेले होते व या तीव्र उन्हामुळे आता कुलर व पंखेसुद्धा फेल ठरत आहेत. उन्हाची तीव्रता पाहता जिल्हावासीयांना घराबाहेर पडताना विचारच करावा लागत आहे. मात्र, कामामुळे घरात राहणे शक्य नसून बाहेर पडावेच लागते. येथेच उष्माघाताचा धोका संभवतो. सातत्याने वाढत चाललेले तापमान व त्यामुळे निर्माण होत असलेला उष्माघाताचा धोका बघता आरोग्य विभाग संचालकांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे बैठक घेऊन वैद्यकीय महाविद्यालयाला उष्माघात कक्ष तयार करण्याचे व त्यातील सुविधांबाबत निर्देश दिले. त्यानुसार वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे यांच्या मार्गदर्शनात उष्माघात कक्ष तयार करण्यात आला आहे.
४ बेडचे कक्ष तयार - या उष्माघात कक्षात ४ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये कुलर बसविण्यात आले असून बाथरूममध्ये शॉवर बसविण्यात आले आहे. शिवाय उष्माघात रुग्णांसाठी लागणाऱ्या सर्व औषधांची सोय या कक्षात करण्यात आली आहे. शिवाय, उष्माघात कक्षातील रुग्णांवर नजर ठेवण्यासाठी विशेष पथक गठीत करण्यात आले असून वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदकिशोर जायस्वाल, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय माहुले व डॉ. शिल्पा पटेरिया यांच्याकडे व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
सध्या तरी एकही रुग्ण नाही- वैद्यकीय महाविद्यालयात तयार करण्यात आलेल्या कक्षात सध्या तरी एकही रुग्ण नाही. म्हणजेच, अद्याप उष्माघाताचे रुग्ण जिल्ह्यात आढळून आले नसल्याचे म्हणता येईल. मात्र, वाढते तापमान बघता नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
नागरिकांनी खबरदारी घ्यावी उन्हाची तीव्रता बघता नागरिकांनी दुपारच्या वेळी उन्हात जाणे टाळावे. सतत कुलर किंवा एसीच्या हवेत बसू नये. भरपूर पाणी प्यावे व त्यातही फ्रिजच्या पाण्याऐवजी माठाचे पाणी प्यावे. पांढरे सुती व सैल कपडे घालावेत. काही त्रास असल्यास दुर्लक्ष न करता लगेच वैद्यकीय महाविद्यालय किंवा जवळील रुग्णालय वा आरोग्य केंद्रात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. -डॉ. अपूर्व पावडे, अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया