लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू असून, आता सात वर्षांचा कालावधी लोटला, मात्र मेडिकलची इमारत अद्यापही तयार केलेली नाही. तसेच विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्नसुद्धा अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे मेडिकलच्या विद्यार्थिनींना परीक्षेच्या तोंडावर वसतिगृहासाठी धावपळ करावी लागत आहे. एकंदरीत शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे मेडिकलच्या विद्यार्थ्यांची कोंडी होत आहे.जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यविषयक सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी सन २०१४ मध्ये गोंदिया येथे मेडिकल कॉलेज सुरू झाले. सध्या मेडिकल कॉलेज केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या इमारतीत सुरू आहे, तर मेडिकलच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी बीजीडब्ल्यू रुग्णालयालगत कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या फ्लॉटमध्ये वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, नवीन बॅचच्या विद्यार्थिनी आल्याने आता एका फ्लॉटमध्ये सहा-सहा विद्यार्थिनींना राहण्याचा आदेश मेडिकलच्या व्यवस्थापनाने काढला आहे. त्यामुळे एकाच फ्लॉटमध्ये सहा विद्यार्थिनींनी राहून अभ्यास करायचा कसा, असा प्रश्न विद्यार्थिनींनी उपस्थित केला, तर मेडिकलच्या व्यवस्थापनाने फ्लॉट हे मोठे असून, त्यात सहा विद्यार्थिनी या सहज राहू शकतात. मेडिकलची आणि वसतिगृहाची नवीन इमारत तयार झाल्यानंतर ही अडचण राहणार नाही. मात्र, आता काही दिवस थोडे ॲडजेस्ट करावे लागेल असे सांगितले. मात्र, या सर्व प्रकारामुळे विद्यार्थिनींना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने त्यांच्या पालकांनी सुद्धा या सर्व प्रकारावर चिंता व्यक्त केली.
बांधकामाला अद्यापही सुरुवात नाहीशहरातील कुडवा परिसरात मेडिकल कॉलेजसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. यासाठी शासनाने ४६८ कोटी रुपयांचा निधीदेखील मंजूर केला आहे. पण, अद्यापही या इमारतीचे बांधकाम सुरू होऊ शकले नाही. इमारत बांधकामाच्या फाईलचा प्रवास अजूनही ऑफिस टू ऑफिसच सुरू आहे.
लोकप्रतिनिधींचे केवळ आश्वासनच - मेडिकल कॉलेजचे बांधकाम त्वरित सुरू व्हावे यासाठी जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगत आहेत. लवकरच बांधकामाला सुरुवात होईल, असे सांगायलासुद्धा ते विसरत नसून याची प्रेसनोटदेखील काढत आहे. मात्र, बांधकामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही.