गोंदिया : काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्यामुळे दक्षता बाळगे गरजेचे आहे. मास्क, सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टन्सिंग याच गोष्टी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (मेडिकल) अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे यांनी कोरोना विषयक जनजागृती आणि नियमांचे पालन करण्यासाठी स्वत:पासून शिस्त लावली आहे. तसेच शासकीय महाविद्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुरुवारपासून ‘नो मास्क, नो एन्ट्री’चा नियम लागू केला आहे. यासाठी त्यांनी गुरुवारी विनामास्क मेडिकलमध्ये येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रवेशद्वारावरूनच परत पाठविले.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी काही जिल्ह्यांत कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. अशात याकडे थोडेही दुर्लक्ष करणे भोवू शकते. त्यामुळेच दक्षता आणि काळजी घेणे हाच यावरील एकमेव उपाय आहे. त्यामुळेच मेडिकलचे अधिष्ठाता यांनी काळजी घेत मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आदींचे काटेकोरपणे पालन करण्यास सुरुवात केली आहे. तसेच रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्या मास्कचा नियमित वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हावासीयांनी सुद्धा काेरोनाच्या संसर्गाकडे दुर्लक्ष न करता आवश्यक ती काळजी घेतल्यास जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यास मदत होऊ शकते.
.......
कोरोना टेस्टची संख्या वाढविणार
कोरोनाचा संसर्ग वाढू नये तसेच पुन्हा पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी जिल्ह्यात कोरोना टेस्ट वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला केल्या आहेत. त्यामुळेच आता मेडिकलमध्ये दररोज ७०० कोरोना टेस्ट केल्या जाणाऱ्या आहेत, तर ग्रामीण भागात सुद्धा टेस्टची संख्या वाढविण्याच्या सूचना केल्या आहे.