दडपण्याचा प्रयत्न : चौकशी समितीत जिल्हा चमू ठेवण्याची मागणीगोंदिया : तिरोडा तालुक्याच्या वडेगाव येथे १४ एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजता उघड्यावर मिळालेल्या औषधीसाठ्याचे प्रकरण दडपण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणावर पांघरून घालण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिष कळमकर यांनी चौकशी करण्यासाठी तिरोडा तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना नेमले आहे. १४ एप्रिल रोजी वडेगाव येथे शुन्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना देण्यात येणारे वीटामीन ए (अ जीवनसत्वाच्या) औषधी व बालकांसाठी असलेल्या जंतनाशक औषधी उघड्यावर फेकण्यात आल्या होत्या. ही बातमी लोकमतने उचलल्यावर दुसऱ्याच दिवशी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिष कळमकर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश तिरोडाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. टेंभूर्णे यांना दिले. डॉ. टेंभूर्णे यांच्या कार्यक्षेत्रातील हे प्रकरण असल्याने सत्यता ते कसे पुढे आणणार? चौकशी करण्यासाठी जिल्हा स्तरावरील वरिष्ट अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी द्यायला हवे होते. परंतु तसे झाले नाही. वडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला सन २०१३-१४ या वर्षात आॅक्टोंबर महिन्यात अल्बेनेझोल ही जंतनाशक व अ जीवनसत्वाच्या औषधीचा साठा पुरविण्यात आला. वडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राने लाखेगाव, मुरमाडी, कोयलारी, वडेगाव, नवेझरी, कोडेलोहारा या सहा उपकेंद्रांना या औषध पुरविल्या आहेत. यापैकी त्या औषध तर नाही ना असाही प्रश्न उपस्थित होत आहे. (तालुका प्रतिनिधी)औषध साठ्याची अजून तपासणी नाहीवडेगाव येथील औषध साठ्याची चौकशी अद्याप करण्यात आली नाही. या घटनेला पाच दिवसाचा कालावधी लोटला मात्र त्या औषध साठ्याची तपासणी अद्याप झाली नाही. चौकशीच्या नावावर फक्त साठा रजिस्टरची फोटो काढून ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. परंतु अद्याप औषध साठाची पाहणी न झाल्यामुळे ही औषधी आली कुठून हा प्रश्न उपस्थित होत आहे.वेळ बदलताच बदलते बयानवडेगाव येथील औषध साठ्या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिष कळमकर यांना विचारणा केल्यावर ते या प्रकरणात प्रत्येक वेळी वेगवेगळी माहिती देतात. पहिल्या वेळी ही औषधी जिल्ह्यात आलीच नाही असे सांगतात. त्यानंतर त्या बॉटलांमध्ये औषधी नव्हती असे सांगतात. त्यावर आमच्याकडे फोटो असल्याचे सांगितल्यावर ते पुन्हा बदलून आमच्या कर्मचाऱ्यांनी एकमेकाला टार्गेट करण्यासाठी हा प्रकार केला असावा असा कयास बांधतात. जिल्हा आरोग्य अधिकारीच यासंदर्भात वेगवेगळी माहिती देवून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत. संशयाची सुई सुकडी आरोग्य केंद्रावरवडेगाव येथे आढळलेली औषधी सुकडी डाकराम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील असू शकते असा संशय वडेगाव येथील डॉ. महेंद्र धनविजय यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा स्तरावरील समितीने चौकशी केल्यास या प्रकरणातील सत्यता पुढे येऊ शकते.‘त्या’ बॉटल उचलणारे दोषी?वडेगाव येथे आढळलेल्या औषधाच्या बाटल्याचा आरोग्य विभागाने पंचानामा करण्यापूर्वीच त्या ठिकाणच्या बॉटल्या रात्र होताच अचानक बेपत्ता झाल्या आहेत. त्यामुळे हे प्रकरण आपल्या अंगावर येऊ नये म्हणून त्या बॉटल्या उचलण्यात आल्या आहेत. त्या बॉटल उचलणारे या प्रकरणात दोषी तर नाही अशी चर्चा आहे. औषधाच्या बाटल्या पहिल्या दिवशी आढळल्या. दुसऱ्या दिवशी अचानक बेपत्ता झाल्या. चौकशी करण्यास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सी.आर. टेंभूर्णे यांना सांगितले आहे. चौकशी अजून सुरूच आहे.-डॉ.हरिष कळमकर जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. गोंदिया औषधीसाठ्याची चौकशी झाली नाही. परंतु साठा रजिस्टरच्या झेरॉक्स काढून तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. चौकशीत ही औषधी कुठली आहे, हे स्पष्ट होणार आहे.- डॉ.महेंद्र धनविजय,वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केंद्र वडेगाव
वडेगावातील औषधी प्रकरण गुलदस्त्यात
By admin | Published: April 19, 2015 12:48 AM