काँग्रेसच्या अनुसूचित जाती आघाडीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:56 AM2018-04-07T00:56:30+5:302018-04-07T00:56:30+5:30
तालुका काँग्रेसच्या वतीने काँग्रेसच्या अनुसूचित जाती आघाडीची तालुकास्तरीय बैठक स्थानिक लक्ष्मी राईस मिलमध्ये बुधवारी (दि.४) पार पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : तालुका काँग्रेसच्या वतीने काँग्रेसच्या अनुसूचित जाती आघाडीची तालुकास्तरीय बैठक स्थानिक लक्ष्मी राईस मिलमध्ये बुधवारी (दि.४) पार पडली.
अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल शेंडे होते. या वेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष भागवत नाकाडे, जि.प. सदस्य गिरीष पालीवाल, अनुसूचित जाती आघाडीचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ टेंभुर्णे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, अर्जुनी मोरगाव विधानसभा प्रमुख रत्नदीप दहिवले, विधानसभा तालुका प्रमुख आनंदकुमार जांभुळकर, राजू पालीवाल, क्रिष्णा शहारे, विशाखा साखरे, सुनील लंजे, भोजराज टेंभुर्णे, राजन खोब्रागडे, वाशीक शहारे व शेकडो कार्यकर्ते उ्पस्थित होते.
सभेमध्ये अर्जुनी मोरगाव तालुका काँग्रेस अनुसूचित जाती आघाडीची कार्यकारिणी सिद्धार्थ टेंभुर्णे यांच्या अध्यक्षतेत गठित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
या वेळी देशात वाढत असलेले दलित अत्याचार व अॅट्रासिटी कायदा कमजोर करण्याचे षडयंत्र यावर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच केंद्र सरकार व महाराष्टÑ शासनाविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला.
अनुसूचित जाती-जमाती व ओबीसी प्रवर्गातील थकीत असलेली शिष्यवृत्ती, दिशाभूल करणारी शेतकऱ्यांची कर्जमाफी, वाढत असलेली महागाई, आरक्षणावर येत असलेली गदा, बंद करण्यात येणारी नोकरबंदी व यामुळे वाढत असलेली बेरोजगारी यावर सखोल चर्चा करुन सद्यस्थितीत केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. पुढील काळात काँग्रेस विचार सरणीची सरकार स्थापन करण्याबाबत निर्धार व्यक्त करण्यात आला. या वेळी आनंदकुमार जांभुळकर, चंद्रशेखर ठवरे, रत्नदीप दहिवले यांनीही सभेला मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक तालुकाध्यक्ष भागवत नाकाडे यांनी मांडले. संचालन क्रिष्णा शहारे यांनी केले. आभार सिद्धार्थ टेंभुर्णे यांनी मानले. काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनुसूचित जाती आघाडी काँग्रेसच्या सभेला युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.