सालेकसा : यंदा हिंदू धर्मातील अक्षय्य तृतीया आणि मुस्लीम धर्मातील रमजान ईद हे दोन्ही सण, एकसारखे गोड व्यंजन बनविण्याचे असून, एकमेकांत गोडवा निर्माण करणारे आहे. हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरे करण्याचा सुरेल संगम साधला. अनेक वर्षांनंतर असा योग यंदा जुळून आला. परंतु कोरोना संकटामुळे प्रत्यक्षात एकमेकांची भेट घेऊन शुभेच्छा देता आल्या नाही.
सध्या सर्वत्र कोरोनाचे थैमान आहे. या संकटामुळे यंदा धार्मिक, सामाजिक सण उत्सव साजरे करणे कठीण झाले आहे. यंदा तर दोन मोठ्या धर्मांतील दोन मोठे सण एकाच दिवशी आले. विशेष म्हणजे या दोन धर्मांतील दोन वेगवेगळ्या सणाच्या दिवशी व्यंजन मात्र एकत्र ते म्हणजे गोड शेवयांची खीर. अक्षय्य तृतीयाला शेवयांची खीर बनवून गोडवा निर्माण केला जातो, तर रमजान ईदच्या दिवशी सुद्धा गोड शेवयांची खीर बनवून एकमेकांना खाऊ घालून गळा भेट करणे आणि मुबारक देण्याला महत्त्व आहे. परंतु यंदा दोन्ही धर्मांतील लोकांना या सणांच्या सुरेख संगमाचा मनाेसक्त आनंद लुटण्याची संधी मिळाली नाही. अक्षय्य तृतीयाच्या दिवशी वर्षातील सर्वात चांगला मुहूर्त असतो. त्यामुळे या दिवशी लोक मांगलिक कार्य, वास्तू पूजन करणे, कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करणे. स्वर्णाभूषण खरेदी करणे इत्यादी शुभ कामे याच दिवशी करतात. परंतु यंदा यापैकी कोणतेही शुभकार्य करता आले नाही. अक्षय्य तृतीयाच्या दिवशी आपल्या पित्तरांना स्मरण केले जाते व लाल माठाचे पाणी पिण्याला सुरुवात केली जाते. लाल माठ भरणे म्हणजे पाण्याचे नियोजन करण्याचे प्रतीक मानले जाते. या दिवशी हिंदू लोक आपल्या सख्या सोयरांना बोलावून भोजनदान करतात. याच दिवसापासून शेतीच्या खरीप हंगामाला सुरुवात होते. अक्षय्य तृतीया साजरी करून बळीराजा आपल्या शेतीच्या कामाला लागतो.
..........
रमजान ईद
हा मुस्लीम बांधवांचा सर्वांत पवित्र मानला जातो. रमजान महिना लागताच मुस्लीम बांधव रोजा (उपवास) सुरू करतात. महिनाभर उपवास केल्यानंतर चंद्रदर्शन झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी ईद साजरी करतात. या दिवशी गोड सेवया बनवून आपल्या नातलगातच नाही तर इतर धर्मांच्या मित्रपरिवाराला बोलावून शेवयांचा आनंद घेतात. एकमेकांची गळा भेट घेतात. भाईचारा निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो.