गोंदिया : कोरोनामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनामुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वेदनांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे आप्तजनांचा जीव गेला, त्यामुळे कुटुंबीय तणावात आहेत. कोरोनानंतर येणारा फेज आत्महत्यांचा राहणार आहे. यासाठी घराघरात संवाद होणे आवश्यक आहे. अन्यथा तणाव वाढून आत्महत्येसारखे पाऊल उचलले जाईल, असे मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. लोकेश चिरवतकर यांनी म्हटले आहे. जगात दरवर्षी ८ लाख लोक आत्महत्या करतात. हा आकडा युद्धात जीव गमावलेल्या व्यक्तींपेक्षा जास्त आहे. प्रत्येक ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करीत आहे. भारतात प्रत्येक तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करीत आहे. कितीतरी कुटुंबे आप्तजनांचा जीव गेल्यामुळे पीडित आहेत. कितीतरी लोकांना आपला रोजगार कोरोनामुळे गमवावा लागला आहे. त्यामुळेही लोक अतिशय मानसिक तणावाखाली आहेत. त्यातून आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी केंद्र सरकारने मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केले आहेत. त्यातून आत्महत्या थांबविल्या जाणार असल्याचे डॉ. चिरवतकर यांनी सांगितले.
--------------------------
कोट
कोरोना महामारीनंतर दुसरी लाट मानसिक आजार व आत्महत्येची येणार आहे. जगभर चर्चा व्हावी याकरिता आत्महत्या थांबविण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. जानेवारी २०२० च्या ‘द हिंदू’च्या सर्व्हेनुसार एका तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो. वर्षाकाठी २५ हजार विद्यार्थ्यांची आत्महत्या भारतात होतात. भारतीय सांख्यिकी विभागानुसार १५ ते २९ या वयोगटातील मृत्यूचे सर्वात मोठे कारण म्हणजे आत्महत्या आहे. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक तणाव व दुर्धर आजारांमुळे खचून जाऊन आत्महत्या केल्या जातात.
- डॉ. लोकेश चिरवतकर, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अधिकारी
.................
कोट
तणाव व कौटुंबिक कलह हे आत्महत्येचे सर्वात मोठे कारण आहे. डिप्रेशन, सिजोफ्रेमिया (संशयाचा आजार), मेनिया (कभी खुशी कभी गम) या मानसिक आजारांमुळेही आत्महत्या होतात. व्यसनांमुळे आत्महत्या वाढतात. दारू हे सर्वात मोठे आत्महत्येसाठी कारण आहे. दारूमुळे व्यक्तीची सारासार विचार करण्याची क्षमता कमी होत जाते. मेंदूत बदल होतात व त्यामुळे ते आत्महत्या करतात.
- डॉ. यामिनी येळणे, मानसोपचार तज्ज्ञ, गोंदिया.
......
मन हलके करणे हाच उपाय
-कोरोनामुळे आप्तांचा जीव गेला, नोकरी गेली, आर्थिक संकट ओढवल्याने तणाव वाढला असून तो कमी करणे आवश्यक आहे.
- कोरोनाच्या संकटाने एकाकी पडलेल्या लोकांना आधार देण्यासाठी त्यांच्या घरात संवाद घडावा, त्या संवादातून तणाव कमी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा.
- सरकार, प्रसार माध्यमे व जनता या तिघांनी मिळून आत्महत्या प्रतिबंध करण्याची गरज आहे. यासाठी सरकारने मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केले पाहिजेत.
- समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांच्या तणावाचे निवारण केले जाऊ शकते. एखादी व्यक्ती बोलत नाही तर त्याच्या हावभावावरून किंवा हालचालीवरून आपल्याला सहज समजते.