गोंदिया : शहराच्या रेलटोली क्षेत्रात वेडसर अवस्थेत फिरत असलेल्या एका ३० वर्षीय मानसिक रुग्ण महिलेस स्थानिक अभियंता वासुदेव रामटेककर यांनी १ जूनला पोलीस संरक्षणात मनोरुग्णालय नागपूरला उपचारांकरिता पाठविले. यामुळे मानसिक रुग्ण महिलेस आसरा मिळाला.
रामटेककर हे ३१ मे रोजी संध्याकाळी रेलटोली क्षेत्रातून जात असताना ही महिला काही असामाजिक तत्त्वाच्या तावडीत सापडलेल्या स्थितीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच गुजराती शाळेसमोर चौकावर बंदोबस्त ड्युटीवर असलेल्या महिला काॅन्स्टेबल सुलोचना मेश्रामच्या साहाय्याने तिची सुटका करवून घेतली. विचारपूस केल्यावर तिने आपले नाव शीला धुर्वे, वडिलांचे नाव बिंदू परतेती व जिल्ह्याचे नाव छिंदवाडा सांगितले. पण यापुढे ती कोणतीच माहिती सांगू शकत नव्हती. सबब रामटेककर यांनी जिल्हा महिला व बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे यांना घटनेची माहिती दिली. यानंतर त्यांच्यासह रामनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन लिखित तक्रार नोंदविली. पोलीस विभागामार्फत या प्रकरणाची लगेच दखल घेऊन या वेडसर महिलेला केटीएस हॉस्पिटलमध्ये दाखल करून वैद्यकीय परीक्षण प्रक्रिया पार पाडली. तसेच स्थानिक न्यायालयाकडून आदेश प्राप्त करून पोलीस कॉन्स्टेबल राजेश सोनवाने, शारदा मौर्या, कुमुद येरणे व पोलीस चालक राधेश्याम कांबळेंच्या संरक्षणात मानसिक रुग्णालय नागपूर येथे दाखल करण्यात आले. या सर्व प्रक्रियेत जिल्हा महिला कार्यालयाचे कपिल टेंभुर्णे, पोलीस शिपाई सुनील बोरकर, महिला शिपाई सोनाली परिहार व देशभ्रतारनेही मोलाचे सहकार्य केले.