गोंदिया : कोरोनाच्या संसर्गाने वर्षभरापासून थैमान घातले. मुलांचे शाळेत जाणे सोडा खेळणे, फिरणेही बंद झाले आहे. घरातल्या घरात चार भिंतीच्या आत राहून मुलेही घरच्याचे ही ऐकायला आता तयार नाही. कोरोनामुळे घरातले वातावरण आता तापू लागले आहे. मुले आईवडिलांच्या डोक्याला जास्तच ताण देऊ लागली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे आपली मुले घरातून बाहेर पडू नयेत तर घरातच कोंडून-कोंडून राहणाऱ्या मुलांना आता कधी शाळा सुरू होताहेत, कधी घराबाहेर मनमोकळेपणाने फिरायला जातो अशी स्थिती निर्माण झाली आहे. शाळेत मुलामुलींसोबत खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांना घरातच वर्षभरापासून राहावे लागल्याने त्यांचे मन उदास झाले आहे. एकाच मोहल्ल्यात राहणाऱ्या मुलांना एकत्र येऊन खेळता येत नाही. वर्षभरापासून शाळेचे दर्शन न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पुढच्या वर्गात टाकले जाणार आहे. त्यांना मागच्या वर्षातील प्रगतीपत्रक हे ‘वर्गोन्नत’ म्हणून राहणार आहे. त्या प्रगतीपत्रकात बराच बदल राहणार आहे. गोंदिया जिल्ह्यात पहिल्या वर्गाचे १४ हजार ५६५ विद्यार्थी दुसऱ्या वर्गात जातील. दुसऱ्या वर्गातील १८ हजार ५४२ विद्यार्थी तिसऱ्या वर्गात जाणार आहेत. तिसऱ्या वर्गातील २० हजार १७६ विद्यार्थी चौथ्या वर्गात तर चवथी मधील २० हजार ४०६ विद्यार्थी परीक्षा न देताच पाचवीत जाणार आहेत. परीक्षेविना ७३ हजारांवर विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात जाण्याची संधी यंदा मिळाली आहे.
.............
पहिलीतील विद्यार्थी- १४,५६५
दुसरीतील विद्यार्थी- १८,५४२
तिसरीतील विद्यार्थी- २०,१७६
चवथीतील विद्यार्थी- २०,४०६
..........
प्रगतीपत्रकच बदलणार
दरवर्षीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीपत्रकावर श्रेणी लिहून राहायची. परंतु यंदाच्या प्रगतीपत्रकावर श्रेणी ऐवजी वर्गोन्नत असे लिहिले राहणार आहे. त्या प्रगतीपत्रकात विद्यार्थ्यांची उपस्थिती दिवस, उंची, वजन, श्रेणी असा उल्लेख राहणार नाही. मुले शाळेतच गेली नाही त्यामुळे त्यांची उपस्थिती नाही. उंची, वजन मोजल्या गेलेच नाही म्हणून हा देखील कॉलम राहणार नाही.
......................
एक वर्षापासून आम्हाला आई वडील घराच्या बाहेर जाऊ देत नाही. शाळाही सुरू नाही. नुसता कोरोना-कोरोना ओरडून सांगितले जाते. घरातच राहा बाहेर जाऊ नका हे ऐकून-ऐकून कंटाळा आला आहे.
श्रेया दिवाळे, विद्यार्थी.
.....................
कोरोनामुळे शाळा बंद आहेत त्यामुळे वर्ग मैत्रिणी मिळत नाहीत. मोहल्लामधील मैत्रिणींना किंवा मित्रांना भेटता येत नाही. कोराेनामुळे घरीच रहा म्हणून सांगितले जाते. घरातच राहून करणार तरी काय हे सुद्धा समजत नाही. माझ्यासोबत बरोबरीचे खेळायला कुणीच नाहीत.
भाविनी ब्राम्हणकर, विद्यार्थीनी
........
शाळेत आम्ही मित्र मंडळी खूप खेळायचो अभ्यासही करत होतो. पण वर्षभरापासून शाळा बंद असल्यामुळे ना अभ्यास ना खेळ काहीच होत नाही. मित्रांपासून आम्ही दूर आहोत. काही वेळ टीव्ही तर काही वेळ मोबाईल व उर्वरित वेळ झोपण्यात घालवतो.
यश दिवाळे, विद्यार्थी
......
कोरोनामुळे वर्षभरापासून वर्ग १ ते ४ चे वर्ग सुरूच झाले नाही. शासनाच्या निर्णयानुसार गोंदिया जिल्ह्यात वर्ग १ ते ४ थी चे ७३ हजार ६८९ विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नत करण्यात येणार आहे. शासनाच्या निर्णयानुसार कार्य करण्यात येते.
राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी गोंदिया.