केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी हा भाग जंगलवेष्ठीत असून प्रामुख्याने मोहफुलांची झाडे अधिक प्रमाणात आहेत. या भागातील शेतकरी, शेतमजूर मार्च व एप्रिल या दोन महिन्यांत मोहफुलाचे संकलन करून मोहफुले वाळल्यानंतर विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु शासनाच्या जाचक धोरणामुळे मोहफुलाची खुल्या बाजारात विक्री करता येत नसल्यामुळे शेतमजुरांची आर्थिक कोंडी होत आहे. परिणामी त्यांना खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात मोहफुले विकावी लागतात. त्यामुळे व्यापारी मस्त अन् मोहफुले विकणारे त्रस्त, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. केशोरी परिसरात जंगलाचे प्रमाण अधिक आहे. त्यातही बऱ्याच अंशी मोहफुलांचे झाडे भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे या भागात मोहफुले संकलन करण्याचे कार्य मार्च व एप्रिल या महिन्यांत मोठ्या प्रमाणात केली जातात. अगदी पहाटेपासून मोहफुले संकलनासाठी शेतमजूर जंगलात जातात. मोहफुले आणल्यानंतर त्यांना वाळत घालून पूर्णपणे सुकल्यानंतर विकण्याची प्रक्रिया केली जाते.मोहफूल व्यापारी अत्यंत कमी दर देवून शेतमजुरांची कोंडी करण्याचा प्रयत्न करतात. या परिसरात मोहफूल घेणारे परवानाधारक व्यापारी नाहीत. अवैधरित्या मोहफुले घेऊन शेतमजुरांवर अन्याय करतात. वास्तविक मोहफुले घेणारे व्यापारी कमी दरात मोहफुले घेऊन शहरात नेवून चांगल्या दराने विकतात. यामुळे मोहफुलाचे व्यापारी मस्त होऊ लागले आहेत. याकडे शासनाने लक्ष देऊन मोहफुलांवरील जाचक धोरण मागे घेऊन खुल्या बाजारात मोहफुले विकण्याची बंदी उठवावी, अशी मागणी शेतमजुरांनी केली आहे. (वार्ताहर)
व्यापारी मस्त, विकणारे त्रस्त
By admin | Published: June 24, 2016 12:12 AM