दैनंदिन व्यवहार जैसे थे : शासनाच्या निर्णयामुळे कापड व्यापारी नाराज लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : देशात वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाला असून शनिवारपासून (दि.१) सुरू झालेल्या या नव्या पर्वामुळे सामान्य जनता तर नव्हे मात्र व्यापारी वर्ग संभ्रमात आहे. वेगवेगळ््या वस्तंूवर वेगवेगळे कर लावण्यात आल्याने व्यापारीही चकरावले असून किती हिशोब ठेवायचा यामुळे त्यांची डोकेदुखी वाढली आहे. जीएसटी पर्वाच्या शुभारंभाचा पहिलाच दिवस तसा सामान्य राहिला. तर येत्या तीन-चार महिन्यांनी जीएसटीचे हे चित्र स्पष्ट होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगीतले. तब्बल १७ कर आणि २५ उपकर समाप्त करीत सरकारने शनिवारपासून (दि.१) जीएसटी लागू केली. पाच टप्यांची करप्रणाली असलेल्या जीएसटीमध्ये काही वस्तूंना शून्य कर असून अन्य वस्तूंवर ५,१२,१८ व २८ टक्क्यांपर्यत कर लागणार आहे. सरकारने जीएसटी मधून लावलेली करप्रणाली सामान्य जनता तसेच व्यापाऱ्यांना संभ्रमात घालणारी ठरत आहे. कारण शासनाने विविध वस्तूंवर विविध टक्के वारी ठरवून दिली असून आता जनतेला आता प्रत्येकच वस्तूंचे दर बघावे लागणार आहे. तर व्यापाऱ्याला आता कोणती वस्तू किती टक्के दरात येत आहे हे जाणूनच दर आकारावे लागतील. एकंदर यामुळे जनता तर कमी मात्र व्यापारी संभ्रमात असून मायबाप सरकारचे आदेश असल्याने कुणीही काहीच बोलायला तयार नाही. कारण, जीएसटी लागू झाल्यानंतर काहीच होऊ शकत नसल्याने सर्वांनीच आता पुढे जुळवून घेण्याची तयारी सुरू केली आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर गोंदियातील बाजारात काहीच नवीन वाटले नाही. दररोजप्रमाणे बाजार होते तसेच दिसून आले. कपडा बाजाराची ख्याती असल्याने शहरातील शोरूममध्ये जावून बघितले असता ग्राहक करतात तशीच खरेदी करताना दिसले. कारण जीएसटीमुळे काही कर लागणार असून वस्तू महागणार एवढेच त्यांना माहिती आहे. तसेही सामान्य जनतेला आता कोणत्या ना कोणत्या करांचा सामना करावा लागत असल्याने त्याची त्यांना सवयच बसली आहे. आता जीएसटी नावाचे वादळ एक नव्या प्रकारचे कर घेऊन आले आहे एवढेच त्यांना माहिती आहे. शिवाय दैनंदिन जिवनात लागणाऱ्या वस्तूंशिवाय जगता येणार नाही. त्यामुळे सरकारने थोपले ते डोक्यावर घ्या अशी मनस्थिती सामान्य जनतेने बनवून घेतली आहे व तसेच चित्र दिसून येत आहे. आता काही दिवसांनंतर जीएसटीची काटेकोरपणे अंमलबजावणी झाल्यानंतरच जीएसटी काय ते स्पष्ट होणार आहे. तीन-चार महिन्यांनी प्रभाव दिसणार येथील चिल्लर कपडा व्यापारी संघाचे सचिव रमेश टहिलयानी यांच्याशी जाणून घेतले असता, आतापर्यंत जीएसटीचे चित्र पूर्णपणे स्पष्ट न झाल्याने जनता व व्यापारी दोघांत परिणाम जाणवत नसल्याचे सांगीतले. आता जो स्टॉक व्यापाऱ्यांकडे आहे त्यावर मात्र जीएसटी लावले जात नसून ग्राहकांकडून आहे ते दर घेतले जात आहे. तर येणाऱ्या दिवसांत जो नवा स्टॉक खरेदी केला जाईल त्यावर व्यापाऱ्यांनाही जीएसटी भरावे लागणार आहे. रेडीमेड कपड्यांवर कर लागत होते. आत मात्र साड्या व सुटींग-शर्टींगवरही कर लावण्यात आले व हे व्हायला नको होते अशी कापडा व्यापाऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे येत्या तीन-चार महिन्यांनी जीएसटीचे खरे चित्र स्पष्ट होणार असून त्याचा प्रभाव दिसणार असल्याचेही टहिलयानी यांनी सांगीतले. पूर्वी कपड्यांवर कर नव्हते. आता मात्र कपड्यांवर कर लावण्यात आल्याने कापड महागणार. रेडीमेड कपड्यांवर कर होते. मात्र आता सुटींग-शर्टींंग व साड्यांवरही कर लावल्याने ते महाग होणार. याचा फटका ग्राहकांच्या खिशावर पडणार असून त्यामुळे व्यापारावर परिणाम पडणार आहे. व्यापाऱ्यांत आंतरीक विरोध असून नाराजी आहे. - रमेश टहिलयानी सचिव, चिल्लर कपडा व्यापारी संघ
जीएसटीमुळे व्यापारी संभ्रमात
By admin | Published: July 02, 2017 12:22 AM