गोंदिया : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर विविध निर्बंधांबाबतचा संदेश व्हायरल होत आहे. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी कुठलेही नवे निर्देश जारी केले नसून, त्यांच्या नावाने फिरणारा संदेश खोटा असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनीच स्पष्ट केले आहे. वृत्तपत्र वापरापासून काहीही धोका नसून, अशा चुकीच्या पोस्ट टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा संदर्भ देऊन ‘जिल्हाधिकारी यांच्याकडून सूचना’ या मथळ्याखाली काही सूचनांचा संदेश व्हॉट्सॲपवर टाकण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून हा संदेश विविध सोशल मीडियावर, प्लॅटफॉर्म्सवर फिरत आहे. या संदेशानुसार कुणीही बेकरी सामान, ब्रेड, पाव घेऊ नये. वृत्तपत्रे दुसऱ्या दिवशी वाचावीत, १५ दिवसांची भाजी-धान्य घरी भरून ठेवावे, ऑनलाईन फूड डिलिव्हरी पूर्णत: बंद करा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, असे कुठलेही निर्देश जारी झालेले नसून हा गैरसमज व भीती पसरविण्याचा प्रकार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. अशा प्रकारचे कोणतेही वृत्त जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्रसारित करण्यात आलेले नाही. राज्य शासनाच्या व जिल्हा प्रशासनाच्या कोविड प्रोटोकॉल सूचनेशिवाय जिल्हा माहिती कार्यालयाकडून असे कोणतेही वृत्त प्रकाशित केले जात नाही. या वृत्ताचा जिल्हा माहिती कार्यालयाशी संबंध नाही, असे जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र गिते यांनी सांगितले.
बॉक्स.....
सायबर सेलकडून तपास
संबंधित पोस्ट कोणी प्रसारित केली याबाबत सदर प्रकरण सायबर सेलकडे तपासणीसाठी देण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना संक्रमण काळात लोकांमध्ये भीती व गैरसमज पसरविणाऱ्या अन्य पोस्टवरही नजर ठेवण्याची सूचना सायबर सेलला केली आहे.
.......
अफवांवर विश्वास नको
वृत्तपत्र वाचल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही. वृत्तपत्र ही पूर्णपणे सुरक्षित आहे. छपाईदरम्यान सॅनिटायझेशनची प्रक्रियाही पूर्ण केली जाते. तसेच वृत्तपत्र वाचल्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आजपर्यंत ऐकिवात नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेही वृत्तपत्रांमुळे कोरोना होत नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये.
- दीपक कुमार मीना, जिल्हाधिकारी