जिल्ह्यात मंगळवारी (दि.२५) १११ बाधितांनी कोरोनावर मात केली तर ७४ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर ६ रुग्णांचा उपचारा दरम्यान खासगी आणि शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत असल्याने कोरोना ॲक्टिव रुग्णाच्या संख्येत घट होत आहे. सद्यस्थितीत केवळ ६८८ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे. शहरी आणि ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याचे समाधानकारक चित्र आहे. कोरोना बाधितांचे मीटर असेच डाऊन राहिल्यास जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १५७३२६ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १३२२७६ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत १५३२०१ नमुने तयार करण्यात आले आहे. यापैकी १३२४१८ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४०३८० कोरोना बाधित आढळले.यापैकी ३९०१७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ६८८ कोरोना ॲक्टिव रुग्ण असून ३८२ स्वॅब नमुन्याचा अहवाल अद्याप गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
.......
१८७९ नमुन्यांची चाचणी ७४ पॉझिटिव्ह
जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने ८३१ आरटीपीसीआर व १०४८ रॅपिड अँटिजन अशा एकूण १८७९ चाचण्या करण्यात आल्या. यात ७४ नमुने पॉझिटिव्ह आले. याचा पॉझिटिव्हिटी रेट ३.९३ टक्के आहे. एकंदरीत कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून संसर्ग आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे.
..............
२ लाख ३१ नागरिकांचे लसीकरण
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे जनजागृती केली जात आहे. तसेच कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत २ लाख ३१ हजार १४७ नागिरकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणासाठी डाेस प्राप्त झाल्याने लसीकरणाला वेग आला आहे.
........
रिकव्हरी दर ९६.६२ टक्के
कोरोना बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने जिल्ह्याच्या कोरोना रिकव्हरी दरात सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह्याचा सद्याचा रिकव्हरी दर ९६.६२ टक्केवर पोहचला आहे. तो राज्याच्या रिकव्हरी दरापेक्षा जास्त आहे.