लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पारंपारिक शेतीला बगल देऊन नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन कमी एक एकर शेतीत नगदी पिकांचे उत्पादन घेत वर्षाकाठी लाखो रूपयांची कमाई येथील प्रयोगशील शेतकरी हेमराज श्रीराम पुस्तोडे यांनी केली आहे. ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मार्गदर्शनासह आर्थिक सहकार्याने पुस्तोडे यांना एक आगळी-वेगळी कलाटणी मिळाली आहे.पुस्तोडे यांच्याकडे वडिलोपार्जीत दीड एकर शेती आहे. अल्पश: शेतीत विविध पिकांचे उत्पादन घेण्यात त्याचा हातखंडा आहे. एका ठिकाणी एकर भर असलेल्या शेतीत पुस्तोडे यांनी शासकीय योजनेतून विहीर खोदली. शेतात बारमाही ओलिताची सोय आणि अर्धा एकरात धानाची लागवड केली जाते. धानाचे उत्पादन हातात आल्यावर त्याच ठिकाणी मका, मिरची व मुंगाचे उत्पादन घेण्याचे तंत्र पुस्तोडे यांनी अवलंबिले.
अशात १० आर जागेत भाजीपाला लावला. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात अर्जुनी-मोरगाव अंतर्गत कृषी सखींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले जाते. उमेदच्यावतीने पुस्तोडे यांच्या सहचारींनी निर्मला यांना कृषी सखी आशा संदेश शहारे यांनी स्वयंसहाय गटाच्या माध्यमातून बिन व्याजी १० हजार रूपयांचे अर्थसहाय मिळवून दिले. तसेच धानाव्यतिरीक्त इतर नगदी पिके घेण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले.
उत्पादन खर्च कमी येण्यासाठी सेंद्रिय शेतीचा वापर करणे, जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी फळभाज्या पिकांवर निंबोळी-दशपर्णी अर्क, जीवामृत वापरण्याचा सल्ला कृषी सखी शहारे यांनी प्रत्यक्ष भेटी प्रसंगी दिला. शिक्षीत असलेल्या पुस्तोडे दाम्पत्याने अल्पश: शेतीतून वर्षभर विविध पिकं घेण्याची किमया अवगत केली.यात त्यांना मकापासून ३८ हजार, मिरची २० हजार रूपयांचा शुद्ध नफा हाती आला. १० आर जागेत मे महिन्यात मल्चिंगचा वापर करुन चवळीच्या शेंगा व भेंडी लागवड त्यांनी केली. अल्पश: खर्चातून जुलै महिन्यापर्यंत ४० हजारांचे उत्पन्न हाती आले असून आॅगस्ट मध्ये सुध्दा उत्पादनात भर पडणार आहे.