गोंदिया : मजुरांना घेऊन जात असलेल्या मिनी टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो उलटून अपघात झाला. या घटनेत टेम्पोत बसलेली एक महिला जागीच ठार झाली असून अन्य चारजण गंभीर जखमी झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर काॅलेजसमोर शुक्रवारी (दि. १२) सकाळी ८.०० च्या सुमारास हा अपघात घडला.
सविस्तर असे की, मिनी टेम्पो (क्रमांक एमएच ३५-एजे १८३२) मध्ये छत्तीसगड राज्यातून मजूर आमगाव तालुक्यातील ग्राम बोरकन्हार येथे वीटभट्ट्यांवर काम करण्यासाठी जात होते. मात्र, येथे रस्ताचे काम सुरू असून सिमेंट रस्त्याचे साइड रिफिलिंग नसल्यामुळे टेम्पो रस्त्याच्याकडेला उतरून पलटी झाला.
या टेम्पोमध्ये एकूण २० मजूर होते व त्यापैकी एक महिला जागीच ठार झाली असून ४ गंभीर जखमी झाले. गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. इतर किरकोळ जखमींना देवरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींना मुल्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे. या घटनेची नोंद देवरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.