गोंदिया : कोरोनानंतर जिल्ह्यात आता म्युकरमायकोसिसचा शिरकाव झाला आहे. या आजाराच्या वीस रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली असून, गोंदिया येथील एका रुग्णावर नुकतीच शस्त्रक्रियासुद्धा झाली आहे. या आजारावरील उपचाराचा खर्च आठ ते नऊ लाख रुपये असल्याने गोरगरीब आणि सर्वसामान्यांची चांगलीच परवड होत आहे. शासनाने म्युकरमायकोसिस या आजाराचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत केला असला, तरी या योजनेंतर्गत केवळ दीड लाख रुपयांपर्यंतचा खर्च दिला जात आहे. त्यामुळे उर्वरित खर्च कुठून करायचा, असा प्रश्न रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसमोर निर्माण झाला आहे. म्युकरमायकोसिसवर उपचारासाठी पैसे जुळवाजुळव करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची चांगलीच धावपळ होत आहे. म्युकरमायकोसिस आजार झालेल्या रुग्णांना ‘एम्फोटिरिसिन बी’ हे इंजेक्शन दिले जाते. या इंजेक्शनचे जवळपास ४० ते ५० डोस द्यावे लागतात. मात्र, या एका इंजेक्शनची किमत ही सहा हजार रुपयांच्या वर आहे. त्यामुळे रुग्णांना त्याचा खर्च करताना चांगलाच घाम फुटत आहे. त्यामुळे शासनाने म्युकरमाकोसिसवरील आजाराचा संपूर्ण खर्च महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून करण्याची गरज आहे.
.......
रुग्णांच्या नातेवाईकांची पैशासाठी धावपळ
माझे वडील महिन्याभरापूर्वीच कोरोना आजारातून बरे झाले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना म्युकरमायकोसिस आजाराची लागण झाली. डॉक्टरांनी किमान सहा ते सात लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले. मात्र, परिस्थिती बेताची असल्याने तेवढा खर्च करायचा कुठून, असा प्रश्न आहे. त्यामुळे नातेवाईक आणि परिचितांकडून पैशाची जुळवाजुळव करावी लागत आहे.
- विलास वाकूडकर, रुग्णाचे नातेवाईक
.....
शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसिस या आजाराचा समावेश केला असला, तरी त्यासाठी केवळ दीड लाख रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, आजाराच्या उपचाराचा खर्च त्यापेक्षा अधिक असल्याने उर्वरित खर्च करायचा कुठून, असा प्रश्न आहे. त्यामुळे या आजाराचा संपूर्ण खर्च या योजनेतून करण्याची गरज आहे.
- पवन भोयर, रुग्णाचे नातवाईक
.....
कोट
म्युकरमायकोसिस आजाराचा समावेश शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत केला आहे. यासंदर्भातील सर्व सूचना या योजनेत समावेश असलेल्या सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालयांना केल्या आहेत. या आजाराचा दीड लाख रुपयांपर्यंतचा खर्च हा या योजनेंतर्गत दिला जाणार आहे.
- डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा शल्यचिकित्सक,
....................
औषधी केवळ नावालाच
- महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसिस या आजाराचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, यावरील शासकीय खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. मात्र, दीड लाखात या आजाराचा खर्च शक्य नसल्याने औषध-गोळ्यांसाठी रुग्णांना स्वत:च्या खिशातून खर्च करावा लागत आहे.
- म्युकरमायकोसिस आजाराच्या रुग्णांना ‘एम्फोटिरिसिन बी’ हे इंजेक्शन द्यावे लागते. शासनाकडून अद्यापही या इंजेक्शनचा रुग्णांना पुरवठा करण्यात आला नाही, तर बाजारपेठेतसुध्दा हे इंजेक्शन उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांची मोठी धावपळ होत आहे.
- महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत १२९९ आजारांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र यापैकी बऱ्याच आजारांवरील औषधे रुग्णालयात मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांना ती बाहेरुन खरेदी करावी लागतात.
...........
म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यातील एकूण रुग्ण : २०
म्युकरमायकोसिसने रुग्णांचे झालेले मृत्यू : ०