तिरोडा : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ५० टक्के नफा जोडून हमीभाव देण्याची घोषणा केली हाेती. मात्र, प्रत्यक्षात तसे न करता उलट पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी केली आहे. शेतकऱ्यांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवून केंद्र सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप प्रहारचे अध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी केला आहे.
महाविकास आघाडी सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसची सरसकट अट रद्द करून पन्नास क्विंटलची अट घातली, तरीसुद्धा शेतकरी ओरडला नाही. मात्र, आता बोनसची पन्नास टक्केच रक्कम शेतकऱ्यांना दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. सर्व शेतकऱ्यांना भीक न देता हक्काचा सरसकट संपूर्ण बोनस देण्यात यावा. आता पेरणीच्या हंगामाला सुरुवात झाली, खत घेणे, कीटकनाशक औषधी, मजुरांची मजुरी देणे, पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे ट्रॅक्टरचे वाढलेले भाडे, कोरोनाचे संकट, हाताला काम नाही, अशात सरकारने सरसकट संपूर्ण ७०० रुपये बाेनस देण्याची मागणी प्रहारचे जिल्हाध्यक्ष यांच्यामार्फत कळविण्यात आले.