बोंडगावदेवी : प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना बाक्टीच्यावतीने कार्यक्षेत्रातील उपकेंद्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. सिरेगाव, बोंडगावदेवी, चान्ना केंद्रात यापूर्वीच लसीकरण करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकी अधिकारी डॉ. श्वेता कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन कोविड लसीकरण राबविल्या जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना अंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रात मिशन कोविड लसीकरण युध्दस्तरावर राबविले जात आहे. दिवसागणिक कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे.
कोरोना महामारीवर आळा घालण्यासाठी शासन स्तरावरून कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. प्रशासनाच्यावतीने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून जनतेने सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुळकर्णी, डॉ. कुंदन कुलसुंगे यांच्यासह आरोग्य पथकाच्यावतीने मिशन कोविड लसीकरण राबविण्यात येत आहे. सिलेझरी येथील आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण शुभारंभाप्रसंगी सरपंच सविता ब्राह्मणकर उपस्थित होत्या. यावेळी १३० जणांना लस देण्यात आली. पिंपळगाव येथील आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण शुभारंभाप्रसंगी उपसरपंच विलास फुंडे उपस्थित होते. गावातील ७० नागरिकांनी लस घेऊन चांगला प्रतिसाद दिला. लसीकरणाच्या आयोजनासाठी डॉ. श्वेता कुळकर्णी, डॉ. कुंदन कुलसुंगे, भारद्वाज, सातारे, साखरे, शिंदे, चौबे, दोनोडे, राऊत, कोडापे, पेंदाम, आशा स्वयंसेविका यांनी सहकार्य केले. ४० वर्षांवरील नागरिकांनी मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नये. कोरोनावर विजय मिळविण्यासाठी समस्त नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. आरोग्य विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या मिशन कोविड लसीकरणाचा लाभ घेण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे, असे डॉ. श्वेता कुळकर्णी यांनी कळविले आहे.