गोंदिया : तालुक्यातील चुटीया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेने खरीप व रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या २८ हजार क्विंटल धानाची अफरातफर करून परस्पर विल्हेवाट लावली. यामुळे या शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणारे पाचशे शेतकरी अडचणीत आले आहेत. यापैकी बहुतेक शेतकऱ्यांचे चुकारे थकल्याने त्यांना आता विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धान खरेदी केली जाते. सहकारी संस्था कमिशन तत्त्वावर शासकीय धान खरेदी करतात. शासकीय धान खरेदी केंद्रावर जमा केलेला धान फेडरेशनकडे जमा करणे अनिवार्य आहे; पण चुटीया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेने मागील खरीप हंगामातील १२ हजार क्विंटल व रब्बी हंगामातील १५ हजार ९९६ क्विंटल असा एकूण २८ हजार क्विंटल धान जमा केला नाही.
तर संस्थेच्या गोदामातसुद्धा तेवढा धान शिल्लक नव्हता. त्यामुळे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या यंत्रणेने गोदामाची तपासणी करून नंतर या संस्थेला धान जमा करण्यासाठी नोटीस बजावली; पण संस्थेने या धानाची परस्पर विक्री केल्याने फेडरेशनने संस्थेच्या ११ संचालकांसह ४ कर्मचारी अशा एकूण १५ जणांवर फसवणुकीचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल केला आहे. फेडरेशनने कायदेशीर कारवाई केली असली तरी या संस्थेच्या केंद्रावर धानाची विक्री करणारे पाचशे शेतकरी अडचणीत आले आहेत. यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांचे चुकारे थकले असल्याने त्यांना आता यासाठी पायपीट करावी लागत आहे.
संचालक व कर्मचारी फरार
चुटीया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेच्या ११ संचालक व ४ कर्मचारी अशा एकूण १५ जणांवर ९ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. याची भनक या सर्वांना लागताच हे सर्व १५ जण मागील सात दिवसांपासून फरार असून, त्यांचा शोध गोंदिया शहर पोलिस घेत आहेत.
श्रीराम अभिनव सहकारी संस्थेच्या संचालकांनी २८ हजार क्विंटल धानाची अफरातफर करून ५ कोटी ७६ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. धानाची अफरातफर केलेल्या रकमेची वसुली करण्यासाठी येत्या दोन-तीन दिवसांत संपत्ती जप्तीची कारवाई सुरू केली जाणार आहे.
- विवेक इंगळे, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी