गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत आतापर्यंत एकूण २३ लाख २३६९ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. खरेदी करण्यात आलेल्या धानाची एकूण किंमत ४३० काेटी रुपये असून यापैकी २४३ कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना करण्यात आले आहेत. तर १४३ कोटी रुपयांचे चुकारे अद्यापही शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे.
जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत धान खरेदी केली जाते. मागील दोन महिन्यांपासून शासकीय धान खरेदी संथगतीने सुरू होती. तर खरेदी केलेल्या धानाची राइस मिलर्सने उचल न केल्याने धान खरेदी केंद्रावर धान ठेवण्याची समस्या निर्माण झाली होती. अखेर राइस मिलर्स आणि शासन यांच्यात तोडगा निघाल्यानंतर आता धानाची उचल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे धान खरेदीला गती येण्याची शक्यता आहे. मागील वर्षी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ३५ क्विंटल धान खरेदी केली होती. तर यंदादेखील तेवढीच खरेदी होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत २३ लाख २३६९ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. जवळपास ३५ टक्के धान खरेदी पुन्हा शिल्लक आहे. त्यातच आता धान खरेदीसाठी केवळ महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे एवढ्या कमी कालावधीत उर्वरित धान खरेदी कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
........
राइस मिलर्सचे आंदोलन मागे
धान भरडाईचे दर निश्चित करा, थकीत वाहतूक भाडे व ७५ कोटी रुपयांची इन्सेटिव्हची रक्कम देण्यात यावी. या मागणीला घेऊन राइस मिलर्स असोसिएशनने शासकीय धानाची भरडाई करणे बंद केले होते. त्यामुळे जागेअभावी धान खरेदी ठप्प होण्याच्या मार्गावर होती. अखेर खा. प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने राइस मिलर्स आणि शासन यांच्यात यशस्वी बैठक होऊन तोडगा निघाल्यानंतर राइस मिलर्सने धानाची उचल करण्यास सुरुवात केली आहे.
.......