सालेकसा : लॉकडाऊन कालावधीत मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणीचा प्रश्न मनसेने जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. यावर प्रशासनाने दखल घेत कोरोना काळातील प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत १० मजूर कामे करु शकतील असे सांगितल्याप्रमाणे मनरेगाची अर्धवट असलेली कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व कामे व आस्थापना बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. त्यामुळे सालेकसा तालुक्यातील मनरेगाअंतर्गत सुरु असलेल्या विविध कामांना सुद्धा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ग्रामीण क्षेत्रात मनरेगाशिवाय इतर कोणतेही काम नसल्याने मजुरांचा उपजीविकेचा प्रश्न उदभवला होता. तहसीलदार कांबळे यांच्याशी संपर्क साधला. त्यावर कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय कामे सुरु करता येणार नाही, अशी माहिती दिली. मागील वर्षीही अशीच परिस्थिती उद्भवली असता तत्कालीन जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी २५ कामगारांना घेऊन कोरोना-१९ च्या सर्व अटींचे पालन करत कामे सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. याचा दाखला देत राहुल हटवार यांनी उपजिल्हाधिकारी (मनरेगा) गोसावी यांना संपर्क साधला व ग्रामीण क्षेत्रातील मजुरांच्या समस्या मांडल्या. त्यावर तोडगा काढत त्यांनी एका कामावर फक्त दहा कामगारांना ठेवता येईल. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करत कामे सुरु ठेवू शकता येतील अशी माहिती दिली. यासंबंधी सालेकसा तहसीलदार कांबळे यांनी सुद्धा उपजिल्हाधिकारी गोसावी यांच्याशी संपर्क साधून सदर विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्यावर तत्काळ कार्यवाही करत गोसावी यांनी दहा मजुरांना घेऊन कामे सुरु ठेवा. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन पाहिजे असे सांगत कामे सुरु करण्याचे आदेश दिले.