लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या काळात शिक्षण बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. ज्या मुला-मुलींना पालक मोबाइलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत होते त्याच पालकांनी ऑनलाइन शिक्षणासाठी अल्पवयीन मुला-मुलींच्या हातात मोबाइल दिला. या अल्पवयीन मुला-मुलींच्या हातात मोबाइल आल्याने त्यांनी ऑनलाइन शिक्षण नावापुरतेच मात्र त्या मोबाइलवर तासंतास घालवून विविध प्रकारचे गेम, यूट्युब, फेसबूक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम याचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू केला. पब्जीसारखे गेम खेळण्यासाठी अल्पवयीन बालके कुठल्याही स्तराला जात आहेत. एक मुलगा दुसऱ्या मुलाकडे असलेला ॲण्ड्रॉईड मोबाइल पाहून आपल्या पालकांकडे हट्ट करतो. सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत हातात असलेला मोबाइल वारंवार छेडला जात असल्याने लहान मुलांत आता डोळ्यांचे आजार बळावले आहेत. शाळा सुरू नसल्याने हातात असलेल्या मोबाइलवर विविध प्रकारचे व्हिडिओ पाहणे, शिक्षणासंदर्भातील असो किंवा मनोरंजनाचे व्हिडिओ असोत किंवा गेम असोत यासाठी अल्पवयीन मुले-मुली मोबाइलच्या अधिन झाले आहेत. मोबाइलच्या नादात असलेली बालके आपल्या पालकांसोबत मुजोरी करतानाही दिसत आहेत.
ही घ्या काळजी- मुलांना गरजेपुरताच मोबाइल द्यावा. ऑनलाइन शिक्षण झाल्यावर मोबाइल मुलांच्या हातात ठेवू नये.- मुले-मुली मोबाइलसाठी हट्ट करीत असतील तर त्यांना मोबाइल न देता त्यांच्या सोबत पालकांनी किंवा घरच्यांनी इतर खेळ खेळावेत.
मोबाइलचे व्यसन हे दारूच्या व्यसनासारखे आहे. मोबाइलच्या स्क्रीनमुळे मुलांच्या डोक्यात (डोपामीन पाथवे) सोबत छेडछाड होते. परिणामी, मुलांना मोबाइलची लत लागते. दारुड्याला दारू मिळाली नाही तर त्याची जशी अवस्था होते तीच अवस्था मोबाइलची लत लागणाऱ्या मुलांना मोबाइल मिळाला नाही तर होते. परिणामी, मुले चिडचिड करतात. घरात तोडफोड करतात. -डॉ. लोकेश चिरवतकर, मानसोपचार तज्ज्ञ, गोंदिया.
मोबाइलचे दुष्परिणाम- मोबाइल गरजेपेक्षा जास्त वापरल्याने लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजारात वाढ होते. त्यामुळे अल्पवयातच मुलांना चष्मा वापरणे आवश्यक होते.- मोबाइलच्या अधिक वापरामुळे डोळ्यांतून पाणी वाहणे, डोळे लाल होणे, खाज सुटणे यांसारख्या गंभीर आजारांना सामाेरे जावे लागते.
ही घ्या उदाहरणेलहान मुले वारंवार मोबाइलवर राहू लागल्याने मुलांचे जग फक्त मोबाइल होऊन बसले आहे. चांगले किंवा वाईट याचे भानच राहत नसल्याने ती मोबाइल गरज होऊन बसलेली मुले मोबाइलसाठी पालकांशी वाद घालतात, अशी अनेक उदाहरणे पुढे आली आहेत.पालकाने मोबाइल आपल्याजवळ घेतल्यावर एका अल्पवयीन मुलाने चिडून वडिलांच्या हातातील मोबाइल हिसकावून जमिनीवर आपटला. परिणामी, १२ हजारांचा मोबाइल बिघडला.मोबाइलसाठी दोन बहीण-भाऊ नेहमीच भांडण करीत असतात. मोबाइल ऑनलाइन शिक्षणासाठी पालकांनी घेऊन दिला; मात्र मोबाइलमुळे बहीण-भावांत वाद होत असल्याने त्यांचा संताप आई-वडिलांना होत आहे.