गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळांतर्गत येणाऱ्या गोंदिया व भंडारा रेल्वे स्थानकांना आदर्श स्थानकांच्या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या स्थानकांवर अधिकाधिक प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गोंदिया स्थानकास या श्रेणीत समावेश करण्यात आल्याने प्रवासी सुविधांमध्ये अतिरिक्त उन्नयनचे कार्य करण्यात येईल. त्या अंतर्गत प्लॅटफॉर्म-५ व ३ वर अतिरिक्त प्लॅटफॉर्म शेल्टरची व्यवस्था करण्यात येईल. अपंगांसाठी तीन प्रसाधनांची सोय, प्लॅटफॉर्म-५ मध्ये कोच इंडिकेटर बोर्ड, प्रथम व द्वितीय श्रेणीमध्ये महिला व पुरूषांसाठी उपलब्ध प्रसाधन गृहांचे नवीणीकरण करण्यात येईल. याशिवाय स्थानकात सर्व प्रकाश व्यवस्थेसाठी अतिरिक्त एलईडी लाईटची तरतूद व सर्व प्रतीक्षालयात टेलिव्हिजनची सोय करण्यात येणार आहे. भंडारा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म-१ वर महिलांसाठी एका अतिरिक्त प्रसाधनाचे बांधकाम करण्यात येईल. तसेच अतिरिक्त ट्रेन इंडिकेटर बोर्डची व्यवस्था करण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांना गाड्यांची ये-जा ची माहिती मिळविणे सहज होईल. तसेच स्थानकात सर्वच ठिकाणी प्रकाश व्यवस्थेसाठी अतिरिक्त एलईडी लाईची तरतूद आहे. प्लॅटफॉर्म-२ व ३ वर अतिरिक्त प्लॅटफॉर्म शेल्टरची व्यवस्था करण्यात येणार आहे. शिवाय प्रतीक्षालयांमध्ये टेलिव्हिजनची सोय करण्यात येईल. ही माहिती देताना दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडल वाणिज्य व्यवस्थापकांनी नागपूर मंडळ प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी नेहमी तत्पर व कार्यरत राहील, असे म्हटले. (प्रतिनिधी)तपासणी अभियानात ७.४५ लाखांचा दंड वसूलदक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाचे मंडल रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ मंडल वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिब्बल यांच्या आदेशानुसार, सहायक वाणिज्य व्यवस्थापकांच्या नेतृत्वात तिकीट निरीक्षक, वाणिज्य निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मंडळांतर्गत १८ ते २३ मे दरम्यान चालविण्यात आलेल्या किलेबंदी चेकिंग अभियानात विनातिकीट, अनियमित प्रवास व सामान बुक न करता लगेजचे २ हजार ६५५ प्रकरणे पकडण्यात आले. यातून ७ लाख ४४ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक यांनी दिलेल्या माहितीनुसार, किले बंदी चेकिंग अभियान दरम्यान २० मे रोजी गोंदिया रेल्वे स्थानकात पकडण्यात आलेल्या ६३३ प्रकरणांत एक लाख ६९ हजार ८४० रूपये, २१ मे रोजी राजनांदगाव रेल्वे स्थानकांत ६१६ प्रकरणांत ४९ हजार ४६५ रूपये, २२ मे रोजी भंडारा रोड स्थानकावर ५३२ प्रकरणांत एक लाख ५१ हजार ९३० व २३ मे रोजी पुन्हा गोंदिया स्थानकावर पकडण्यात आलेल्या ५२१ प्रकरणांत एक लाख ४५ हजार १५ रूपये दंड वसूल करण्यात आला. तसेच कचरा पसरविणाऱ्यांच्या २१ प्रकरणांत दोन हजार १०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
रेल्वे स्थानकाचा ‘आदर्श’ कायापालट
By admin | Published: May 26, 2016 12:41 AM