देवरी : भातशेतीत विविध आव्हान पाहता पारंपरिक शेतीला फाटा देऊन शेतकऱ्यांनी कमी खर्चाचे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे, आधुनिक तंत्रज्ञानामुळे धान शेतीला नवसंजीवनी मिळेल, असे प्रतिपादन कृषी उपसंचालक तथा जिल्ह्याचे पालक संचालक विष्णू साळवे यांनी केले.
तालुक्यातील निलज येथे कृषी संजीवनी सप्ताहाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान ते बोलत होते. तालुक्यामध्ये २१ जून ते १ जुलै या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. कृषी संजीवनी सप्ताहाचे निरीक्षक म्हणून विष्णू साळवे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तालुक्यातील निलज येथे महिला शेतकरी मेळाव्याला त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी मंगेश वावधने, तालुका कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम, मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत कोळी, विकास कुंभारे, उमा घरत, केशव घरत, सावत राऊत, सलामे व महिला शेतकरी उपस्थित होते. पारंपरिक भात शेती अत्यंत खर्चिक होऊन आर्थिकदृष्ट्या तोट्याची झालेली आहे. तसेच पारंपरिक शेतीमध्ये धानाच बियाणे फेकून पेरणी केली जाते. त्यामुळे कमी जागेत अनियंत्रित व असंख्य रोपे तयार होऊन रोपाची संख्या अमर्यादित राहते. पर्यायाने सूर्यप्रकाश हवा खेळती राहत नसल्याने शत्रुकिडीच्या विविध आजारांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे याचे वेळीच व्यवस्थापन करण्याच्या सूचना साळवे यांनी केल्या. क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी कृषी पर्यवेक्षक जी.एस. पांडे, शिवकुमार येडाम, मनोहर जमदाल, गिरिजाशंकर कोरे, सचिन गावळ, हुडे, सखी महिला मंच, मावि मंडळाचे महिला सदस्या यांनी सहकार्य केले.
.........
प्रात्यक्षिकातून दिली माहिती
कमी खर्चाचे तंत्रज्ञान सुधारीत व नियंत्रित भात लागवड चारसूत्री पध्दती, श्री पध्दती, पट्टा पध्दतीने लागवड तंत्रज्ञान, आपत्कालीन परिस्थितीमध्ये ड्रम सीडर पेरणी यंत्राचा वापर, जैविक पध्दतीने कीटकनाशक तयार करण्याचे इत्यादी तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करणे ही काळाजी गरज बनलेली आहे. कृषी संजीवनी सप्ताहाच्या चौथ्या दिवशी सुधारीत भात लागवड तंत्रज्ञान या प्रमुख विषयावर प्रचार प्रसिध्दी करण्यासाठी कृषी विभागाचे पथकाकडून निलज येथील प्रगतीशील शेतकरी केशव घरत यांच्या प्रांगणात विविध बाबींचे छोटेखानी प्रदर्शन दाखविण्यात आले.