गोंदिया : देशात दोन समुदायांची वाटणी करणाऱ्या राममंदिर-बाबरी मस्जीद वादावर सकारात्मक तोडगा काढून दोन समुदायांत आपसी भाईचारा वाढविला. शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत व प्रत्येक गावात घरकुलांना मजुरी देऊन प्रत्येकाला २०२२ पर्यंत पक्के घर देण्याचे वचन मोदी सरकारने निभावले. कोरोना काळात गरिबांना मोफत रेशन व गॅस सिलिंडर दिले. बचतगट संलग्न महिलांच्या खात्यात ५०० रुपये टाकून मदत दिली. तर आता सरकारी रुग्णालयांत कोरोनाची लस मोफत दिली जात आहे. मागील ७० वर्षांत जे काम होऊ शकले नाही ते क्रांतिकारी काम मागील ७ वर्षांत नरेंद्र मोदी सरकारने केले. देशाला सकारात्मक विकासाकडे नेण्याचे काम मोदी सरकारने केले असल्याचे प्रतिपादन माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्यावतीने आयोजित गोंदिया तालुका ग्रामीण मंडळाच्या बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी खासदार सुनील मेंढे यांनी, आज दोन्ही जिल्ह्यातील परंपरागत धान खरेदी केंद्रांना हटवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपले केंद्र उघडले आहे. या केंद्रांवर शेतकरी टोकन घेऊन फिरत असून, फक्त व्यापाऱ्यांचा धान घेतला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते दोन हजार कोटींचे बोनस वाटल्याच्या गोष्टी करीत आहेत. मात्र यातील १९०० कोटींचा बोनस राष्ट्रवादीच्या नेत्यांकडेच जात आहे. जे नेता मागील ३०-३५ वर्षांपासून गोंदिया-जबलपूर ब्रॉडगेजचे काम करू शकले नाही, ते काम मोदी सरकारने ७ वर्षांत पूर्ण करून आता गाडीही चालवून दिल्याचे सांगितले.
नेतराम कटरे यांनी, ठाकरे सरकार फक्त घोषणा करत आहे. कर्जमाफीत ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली, त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत १ रुपयाची मदत मिळालेली नाही. उलट आता वीज कापण्याची घोषणा करून जनतेशी विश्वासघात करीत असल्याचे सांगितले. माजी जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी, राज्य सरकार फक्त राज्यातील जनतेला लुटण्याचे काम करीत आहे. यात वीजदर असो की कर असो. मागील १ वर्षातील कोरोना काळात जेथे सर्वसामान्यांची आवक घटली आहे, तेथे राज्य सरकारने प्रत्येक कर ४-५ पट वाढवित असल्याचे सांगितले.
बैठकीला संघटन मंत्री बाळा अंजनकर, बाबूलाल रहांगडाले, योगराज रहांगडाले, सुनील केलनका, नंदू बिसेन, अशोक चौधरी, संजय टेंभरे, नरेंद्र तुरकर, ओम कटरे, धनलाल ठाकरे, गुड्डू कारडा, राजेश चतुर, तिजेश गौतम, मनोज मेंढे, देवचंद नागपुरे, भावना कदम, छाया दसरे, प्रकाश रहमतकर, योगेश्वरी रहांगडाले, वंदना चुटे, हेमराज बिसेन, राजेश हरिणखेडे, पन्नालाल हरिणखेडे, गणेश हरिणखेडे, कुसोबा मस्के, दिनेश तिडके यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.