तिरोडा : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेकडे दुलर्क्ष, पेट्रोल डिझेलचे वाढते दर, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या ५० टक्के नफा जोडून हमीभाव हे सर्व देण्यात केंद्र सरकारला आहे. खोटे बोलून देशात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याशिवाय दुसरे काहीच केले नसल्याची टीका महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी येथे आयोजित कार्यक्रमात केले.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारपासून महाराष्ट्र दौऱ्याला गोंदियापासून सुरुवात केली. यादरम्यान तिरोडा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले, रब्बी हंगामातील धान खरेदीची प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील बोनसबाबत शेतकऱ्यांनी शंका बाळगू नये, बोनस निश्चित मिळेल, असे सांगितले. यावेळी पटाेले यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तिरोडा तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने पटोले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हांडोरे, आ. अभिजित वंजारी, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष नामदेव किरसान, कार्याध्यक्ष रत्नदीप दहिवले, राधेलाल पटले, रमेश दुलीचंद टेंभरे, शोभेलाल दहिकर, गिरधर बिसेन, रामलाल राहंगडाले, भूमेश्वर पारधी, शैलेश कुमार मोहारे, संजय खियानी, बबलू राहंगडाले, भूमेश्वर यादव, संजय जांभुळकर, दीपक नंदेश्वर, किरण श्रीपतरी, दामू येरपुडे, रोशन लिल्हारे, राजेश ताडेकर, दिलीप ढाले, विक्रम पटले उपस्थित होते.