जेसीबी व पोकलँडचा वापर : अगोदर मोठ्या नाल्यांची स्वच्छता लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : पावसाळा आता तोंडावर असून जिल्ह्यातील काही भागांत पावसाने आगमनाचे संकेत दिले आहेत. तुंबणाऱ्या पावसामुळे निर्माण होणाऱ्या समस्या पाहता नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून मान्सूनपूर्व सफाई अभियानाला सुरूवात करण्यात आली आहे. सोमवारपासून (दि.२९) शहरात अभियान सुरू झाले असून सध्या जेसीबी व पोकलँडच्या माध्यमातून मोठ्या नाल्यांची सफाई सुरू आहे. पावसाळ््या पुर्वी शहरातील पाणी वाहून नेणारे मोठे नाले नगर परिषदेकडून जेसीबीच्या माध्यमातून साफ केले जातात. जेसीबीद्वारे या नाल्यांतील गाळ व कचरा काढून त्यांना मोकळे केले जाते. जेणेकरून त्यातून पावसाचे पाणी वाहून जावे व कुणाच्या घरात पावसाचे पाणी शिरू नये. त्यानुसार नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून गुरूवारपासून शहरात मान्सून पुर्व सफाई अभियानाला सुरूवात झाली आहे. या अभियानांतर्गत सध्या नगर परिषदेकडून जेसीबी व पोकलँडच्या माध्यमातून पाण्याची निकासी करणारे मोठे नाले साफ केले जातात व बलाघाट रोड टी-पॉईंट येथील नाल्याच्या सफाईने सफाई अभियानाला सुरूवात करण्यात आली. याशिवाय शहरातील श्रीजी लॉन लगतचा नाला, राजाभोज कॉलनी, कटंगी नाला, विवेकानंद कॉलनी, गणेशनगर स्टेट बँक कॉलनी व रिंग रोडवरील नाल्याची सफाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सफाईच्या या कामात शहरातील नाल्यांवर करण्यात आलेले अतिक्रमण सफाई कामगारांसाठी डोकेदुखीचे ठरते. नाल्यांवरील बांधकामामुळे नाल्यांची योग्य प्रकारे सफाई होत नाही. परिणामी नाल्यांत गाळ साचून राहतो. परिणामी नाल्यांतले पाणी रस्त्यावर येते व त्याचा फटका शहरवासीयांसह खालच्या भागातील रहिवाशांना भोगावा लागतो. सफाई अभियानातून आता शहरातील नाल्यांची व्यवस्थित सफाई करण्याची गरज असून तशी मागणीही शहरवासी नगर परिषदेकडे करीत आहेत. २५ कामगार आणखी घेणार मान्सुन पूर्व सफाई अभियानांतर्गत नगर परिषदेच्या सफाई विभागाकडून मोठ्या नाल्यांसाठी जेसीबी व पोकलँडचा वापर केला जात आहे. मात्र लहान व मध्यम नाल्यांची सफाई सफाई कामगारांकडून करवून घेतली जाते. यासाठी विभाग २५ सफाई कामगार आणखी घेणार असून त्यासाठी निविदा मागविली जाणार आहे. निविदा उघडल्यानंतर ही माणसे उपलब्ध होणार व त्यांच्या माध्यमातून महत्वाचे नाले सफाई करविले जाणार.
शहरात सुरू झाली मान्सूनपूर्व सफाई
By admin | Published: May 31, 2017 1:08 AM