कपिल केकत
गोंदिया : यंदा पावसाच्या लहरीपणाने सर्वांचेच टेन्शन वाढले आहे. हेच कारण आहे की, पावसाळा आता शेवटच्या टप्प्यात आला असूनही जिल्ह्यातील ३२ मध्यम व लघु प्रकल्पांतील फक्त पाच प्रकल्पच पाण्याने शंभर टक्के भरून आहेत. मात्र, अन्य प्रकल्पांमध्ये पाणी नसून त्यातही कित्येकांत ठणठणाट आहे. मागील वर्षी हेच प्रकल्प शंभर टक्के भरून होते व ते पाणी आतापर्यंत कामी आले. अशात आता दमदार पावसाची अत्यंत आवश्यकता असून, असे न झाल्यास मात्र पुढील वर्ष कठीण जाणार आहे.
यंदा जून महिन्यात पावसाने दया दाखविली नाही. परिणामी, जून कोरडाच गेला व शेतकऱ्यांना शेतीची कामे करता आली नाही. जुलै महिन्यात पावसाने बऱ्यापैकी साथ दिल्याने शेतीची कामे सुरू झाली व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आले. जुलै महिन्यातील पावसामुळेच नदी-नाले व प्रकल्पांत पाणी आले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मात्र, ऑगस्ट महिन्यात थोडाफार बरसल्यानंतर पावसाने परत दडी मारली आहे. परिणामी, प्रकल्पांत पाणी आले नाही व त्यांची तहान अद्याप भागलेली नाही. आता पावसाळा शेवटच्या टप्प्यात असून, ३० सप्टेंबरपर्यंत सतत दमदार पावसाची गरज आहे. कारण, असे न झाल्यास पुढील वर्षासाठी मात्र त्रास जाणार यात शंका नाही.
१५ प्रकल्पांत ७५ टक्क्यांवर पाणीसाठा
जिल्ह्यात ९ मध्यम तर २३ लघु प्रकल्प आहेत. यातील फक्त कटंगी मध्यम प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा असून, डोंगरगाव, मोगरा, बेवारटोला व भुराटोला या चार लघु प्रकल्पांत शंभर टक्के पाणीसाठा आहे. याशिवाय, बोदलकसा, चुलबंद, रंगेपार या तीन मध्यम प्रकल्प व आक्टीटोला, पिपरीया, राजोली, सडेपार, जुनेवानी व उमरझरी या सहा लघु प्रकल्पांत ७५ टक्क्यांवर पाणीसाठा आहे. उर्वरित प्रकल्पांमध्ये याही पेक्षा कमी साठा असून, यावरून जिल्ह्यात पाण्याची किती गरज आहे, हे दिसून येते.
मागील वर्षी होते लबालब
मागील वर्षी जिल्ह्यावर वरुणराजा चांगलाच मेहरबान होता व त्यामुळेच अति दमदार पाऊस बरसला होता. यामुळेच मागील वर्षी या काळात जिल्ह्यातील मुख्य प्रकल्पांसोबतच मध्यम व लघु प्रकल्पही पाण्याने लबालब होते. यंदा मात्र पाऊस पाहिजे तसा बरसलेला नाही. परिणामी, प्रकल्पांत पाणीसाठा नाही. मागील वर्षीच्या पाण्यामुळेच यंदा जिल्ह्यात रब्बी हंगाम पिकला. आता उरलेल्या काळात पावसाने साथ दिली तरच या प्रकल्पांची तहान भागणार व पुढील वर्षासाठीही सोय होणार.
या प्रकल्पांची दयनीय स्थिती
- जिल्ह्यातील काही लघु प्रकल्पांत फक्त नाममात्र पाणीसाठा असून, त्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. यामध्ये गुमडोह प्रकल्पात ३४.५३ टक्के, कालीमाती प्रकल्पात २०.८४ टक्के, रेहाडी प्रकल्पात ३७.९९ टक्के, सोनेगाव प्रकल्पात २८.६७ टक्के, सालेगाव प्रकल्पात २८.३५ टक्के तर ओवारा प्रकल्पात फक्त ४९.५७ टक्केच पाणीसाठा आहे.
मुख्य प्रकल्पांतील पाणीसाठा
प्रकल्प - पाणीसाठा टक्केवारी
इटियाडोह - ७८.२८
सिरपूर - ६७.०६
कालीसरार - ६१.७८
पुजारीटोला - ५९.१३
ऑक्सिजनवरील लघु प्रकल्प
प्रकल्प - टक्केवारी
गुमडोह- ३४.५३
कालीमाती- २०.८४
रेहाडी- ३७.९९
सोनेगाव- २८.६७
सालेगाव- २८.३५
ओवारा- ४९.५७