सालेकसा : तालुक्यातील बिजेपार प्राथमिक आरोग्य केंद्रांंतर्गत कोटरा या गावी ११ जुलै रोजी डेंग्यूचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर सतत रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेली असून आज एक महिन्यापेक्षा जास्त दिवस लोटून ही कोटरा हे गाव डेंग्यूच्या जबड्यात कायम आहे. सुदैवाने आरोग्य विभागाच्या तत्परतेने आतापर्यंत एक ही रुग्ण दगावला नाही. वेळेवर योग्य औषधोपचार मिळत असल्याने या गंभीर आजारापासून मृत्यू थांबविण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. परंतु गावात डेंग्यूचे थैमान कशामुळे पसरले याचे कारण आतापर्यंत गावकऱ्यांना तसेच आरोग्य विभागाला गवसले नाही. त्यामुळे अनेक उपाययोजना करूनही गावात डेंग्यूची लागण थांबलेली नाही. यामुळे संपूर्ण परिसर हादरले आहे. तसेच आरोग्य विभागसुध्दा चिंतेत पडला आहे. ७२३ लोकसंख्या व १७९ घरे असलेले कोटरा गाव सालेकसा तालुक्याच्या वाघनदी वरील पुजारीटोला धरणाच्या शेजारी वसले आहे. या गावात एवढ्या प्रमाणावर डेंग्यूचे थैमान पहिल्यांदाच पसरले असून मागील एका महिन्यात ७२३ लोकांपैकी ५९७ लोकांना डेंग्यूची लागण झाली आहे. अर्थात एकूण लोकसंख्येच्या ८३ टक्के लोकांना डेंग्यूने आपल्या जबड्यात पकडले. परंतु आरोग्य विभागाने तत्परता दाखविली तसेच जिल्हा पातळीवरील पदाधिकारी व आरोग्य अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी व त्यांच्या चमूने प्रत्यक्ष लक्ष दिल्यामुळे प्रत्येक रुग्णांना ताबडतोब रक्त तपासणी व औषधोपचार देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत कोणीही रुग्ण दगावला नाही. हे आरोग्य विभागाचे मोठे यश मानावे लागेल. गंभीर अवस्थेत १०६ रुग्णांना गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. आश्चर्याची गोष्ट कशी की गावात ठिक ठिकाणी रोगप्रतिबंधक उपाय राबविण्यात आले. यात नाल्यांची साफसफाई, स्वच्छता मोहीम राबवून धूर फवारणी, एबॅक नावाच्या औषधीचे द्रावण टाकण्यात आले. तसेच पाणी साचलेल्या ठिकाणी गप्पी मासे टाकण्यात आले.स्वच्छता मोहीम सतत एक महिन्यापासून राबवित असूनसुध्दा डेंग्यू पसरण्याचा क्रम थांबला नाही. १५ आॅगस्ट रोजी एकूण ३४ रुग्ण गोंदिया येथे भर्ती होते. तर इकडे गावात रक्ताचे दूषित नमूने मिळण्याचे क्रम सुरू होते. आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन लोकांची आरोग्य व रक्त तपासणी मोहीम राबवित आहेत. रक्ताचे नमूचे घेऊन काही आरोग्य कर्मचारी सतत कोटरा ते गोंदिया ये-जा करीत आहे. दूषित रक्त आढळल्यास त्याला त्वरीत पीएचसीच्या वाहनाने किंवा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या वाहनाने गोंदियाला येऊन भर्ती करण्यात येत आहेत. आतापर्यंत ५९७ पैकी ४९१ रुग्णांना स्थानिक कॅम्पमध्ये औषधोपचार देण्यात आला, तर १०६ लोकांना गोंदिया येथे भर्ती करण्यात आले. यात ८३ रुग्णांना केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय, १८ रुग्णांना बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय आणि पाच रुग्णांना खासगी दवाखान्यात औषधोपचार देण्यात आले आहे. यात ७२ रुग्णांना आणि काल २९ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. आज १२ लोकांवर उपचार सुरूच होते. दरम्यान आतापर्यंत कोटरा या गावाला आ. रामरतन राऊत, जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, सभापती छाया बल्हारे, जि.प. सदस्य श्रावण राणा, पं.स. सदस्या संगीता शहारे, अनिल फुंडे, बीडीओ व्ही.यु. पचारे यांनी भेट दिली. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ. हरीश कळमकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज गहलोत, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सलील पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विवेक अनंतवार हे सतत कोटरा गावाकडे लक्ष देत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात बिजेपार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वल देवकाते, डॉ. रायपुरे, डॉ. प्रियंका कंगाले, डॉ. अभिजीत ढोरे यासह दोन आरोग्य सेवक, दोन आरोग्य सेविका, एक सहायक परिचर सर्व चमू कोटरा गावात सतत फिरत असून रक्त तपासणी करीत आहेत. गावकऱ्यांना धाडस देत आहेत. (प्रतिनिधी)
एक महिन्यापासून कोटरा गाव डेंग्यूच्या जबड्यात
By admin | Published: August 17, 2014 11:14 PM