गोंदिया : जिल्ह्यातील गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली, ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके, साधारण श्रेणीचे बालके, मध्यम कमी वजनाची बालके व तीव्र कमी वजनाची बालके यांच्यासाठी १ ते ३० सप्टेंबर हा संपूर्ण महिना पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी भागातील १८०५ व शहरी भागातील ९७ अंगणवाडी केंद्रे, अशा एकूण १९०२ अंणवाडी केंद्रात पोषण अभियानात बालक व महिलांचा पोषणाच्या दर्जा सुधारण्यासाठी व कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध स्तरांवरून उपक्रम राबविण्यात येणार येणार आहे.
अंगणवाडी, ग्रामपंचायत स्तरावर, शालेय स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. अंगणवाडी केंद्रात दरमहा सामुदायिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. गर्भवतीचा तिसरा महिना साजरा करणे, अन्न प्राशन, सुपोषण दिवस, पूर्व प्राथमिक शिक्षण नोंदणी व आरोग्यविषयक संदेश जनतेपर्यंत पोहोचविणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. कुपोषण निर्मूलनाबाबत व आरोग्य शिक्षणासंदर्भात समाजास जागृत करण्यासाठी आयईसी हे एक प्रभावी माध्यम आहे. १ ते १७ ऑगस्ट २०२१ या कालावधीदरम्यान गोंदिया जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व आदिवासी क्षेत्रातील १८०५ अंगणवाडी केंद्रामध्ये बालकांची वजन व उंची, तसेच आरोग्य तपासणी करण्यात आली. सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय पोषण महिना या उपक्रमाला सर्व सहकारी विभागांनी व नागरिकांनी सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी कळविले आहे.
बॉक्स
मातृवंदन योजनेचा मिळेल लाभ
या अभियानादरम्यान महिला व बालविकास विभागाकडील माझी कन्या भाग्यश्री व आरोग्य विभागाकडील मातृ वंदन योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यात मातृ वंदन योजनेंतर्गत ४६ हजार ३७ उद्दिष्ट आहेत. त्यातील ४२ हजार ४५० लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. त्यासाठी १ कोटी ९३ लाख ६० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली. माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत ६४९ लाभार्थ्यांना गुंतवणूक प्रमाणपत्र देण्यात आले आहे.