गोंदिया : रात्रीच्या वेळी समोर वाहन असल्याचे कळावे व समोरचे वाहन किती लांब आहे याचा अंदाज दुसऱ्या वाहनचालकाला यावा यासाठी वाहतूक सुरक्षा पंधरवड्यात जिल्ह्यातील १० हजारावर वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले. यासाठी रस्ता सुरक्षा पंधरवाड्यादरम्यान वाहतूक पोलीस व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले. काही रिफ्लेक्टर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तर काही वाहतूक पोलिसांनी खरेदी केले आहेत. देवरी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांनी ५ हजार रिफ्लेक्टर सायकलींना लावण्याचे उद्दिष्ट्ये ठेवले होते. गोंदिया वाहतूक पोलिसांनी २ हजार सायकलींना व १ हजार रिफ्लेक्टर इतर वाहनांना, १ हजार रिफ्लेक्टर दुचाकीला, १०० रिफ्लेक्टर बैलबंडीला तर ५० रिफ्लेक्टर रिक्षांना लावल्याचे सांगण्यात आले. सोमवार व मंगळवारी रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम राबविण्यात आली. माजी आ.रामरतन राऊत यांच्या वाहनालाही रिफ्लेक्टर लावण्यात आले हे विशेष. रिफ्लेक्टर लावण्याचा कामात नमाद महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. रिफ्लेक्टर मोफत लावण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)यासाठी हवे रिफ्लेक्टररस्त्याच्या बाजुला उभे असलेले वाहन येणाऱ्या-जाणाऱ्या वाहन चालकांना दिसत नसल्यामुळे त्यांना रिफ्लेक्टर लावणे गरजेचे असते. वाहन धावता-धावता अचानक बंद पडले तर रिफ्लेक्टरमुळे रात्रीच्या वेळी ते वाहन दिसून येते. एखादे वाहन धावताना पंक्चर झाले तर त्या वाहनावर दुसरे वाहन आदळू नये यासाठी रिफ्लेक्टर लावणे आवश्यक असते. ९२ वाहनांवर कारवाई रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे गुरूवारी करण्यात आलेल्या कारवाईत ९२ प्रकरणात वाहनधारकांकडून ९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नो पार्र्कींग, हेल्मेट, ट्रिपल सीट, वाहन चालविण्याचा परवाना न ठेवणे, फॅन्सी नंबर प्लेट, सिटबेल्ट, परवानापेक्षा अधिक प्रवासी बसवणे अशा विविध कारणामुळे ९२ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. सदर कारवाई पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश सादगीर, केशव बावळे व कर्मचाऱ्यांनी केली.
१० हजाराहून अधिक वाहनांना रिफ्लेक्टर
By admin | Published: January 17, 2015 1:49 AM